fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली – चंद्रकांत पाटील

पुणे : महाविकास आघाडी सरकार एकीकडे सत्तेच्या माध्यमातून दादागिरी व दडपशाही करत असतानाच दुसरीकडे सत्ताधारी आघाडीला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली असून भारतीय जनता पार्टी त्याबद्दल चिंता व्यक्त करून निषेध करते, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर भाजपा कार्यकर्ते मोहित कंबोज यांच्या गाडीवर काल रात्री तीनशे ते चारशे जणांच्या जमावाने हल्ला केला. त्या आधी भाजपाच्या मुंबईतील पोलखोल यात्रेच्या रथाची मोडतोड करण्यात आली व हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे आढळले. अपक्ष खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास निघाले तर त्यांच्या मुंबईतील घराबाहेर जमाव जमवून सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखले. एखाद्या कार्यकर्त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केली तर शिवसैनिक घरात घुसून दमबाजी करतात. राज्यात हुकुमशाही आली का, आणीबाणी लागू झाली का, असे प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती पूर्ण बिघडली आहे.

ते म्हणाले की, हनुमान चालिसा म्हणण्यात विरोध करण्यासारखे काय आहे ? एखादी व्यक्ती आपल्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यास येत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्याला मानाने घरात बोलावावे. तसे नको असेल तर रोखण्यासाठी पोलिसांना बोलवावे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरविणे आणि त्यांनी हिंसक विरोध करणे हे अनाकलनीय आहे. मुख्यमंत्र्यांच्या संरक्षणात पोलीस कमी पडले का, त्यांना राज्य चालविता येत नाही का, असे प्रश्न यातून निर्माण होतात.

त्यांनी सांगितले की, वीज खरेदीत कमिशन मिळावे यासाठी राज्यात कृत्रिम वीज टंचाई निर्माण करून लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. पाणी उपलब्ध असून शेतकरी ते पिकांना देऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार होते त्यावेळी पाच वर्षे राज्यात लोडशेडिंग बंद होते. पण आता पुन्हा कमिशनसाठी लोडशेडिंगचे कृत्रिम संकट आणले आहे. भाजपा हे सहन करणार नाही. याच्या विरोधात आम्ही उद्यापासून आंदोलन करत आहोत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading