डॉ.आंबेडकर हे केवळ दलित मुक्तीचे नव्हे तर मानवमुक्तीचे नेते – डॉ.श्रीपाल सबनीस

पुणे : शेतकरी, स्त्रिया, गरीब, कामगार, आदिवासी यांच्या मुक्तीचा प्रयत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. बाबासाहेबांचे जीवन संघर्षमय होते. जातीव्यवस्थेची आग बाबासाहेबांनी मनामध्ये कशी शांत केली, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. समतेच्या चळवळीच्या दृष्टीने बाबासाहेबांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे डॉ.आंबेडकर हे केवळ दलित मुक्तीचे नव्हे तर मानवमुक्तीचे नेते आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आॅनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. व्याख्यानमालेचे उद््घाटन डॉ.सबनीस यांच्या व्याख्यानाने झाले. यावेळी इन्स्टिटयूटस्चे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते. लायन्स क्लब इंटरनॅशनल, लायन्स क्लब ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट, लायन्स क्लब ग्लोबल टीचर्स, लायन्स क्लब ऑफ पुणे पर्ल यांनी आयोजनात सहभाग घेतला आहे.

डॉ.श्रीपाल सबनीस म्हणाले, बहुजन समाजाच्या उद्धारासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची गरज यापूर्वीही होती, आजही आहे आणि उद्याही आहे. जगातील अनेक देशांत डॉ. आंबेडकरांचे पुतळे उभे आहेत. पाश्चात्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा गौरव केला आहे. मात्र, भारतातील जातीव्यवस्था आजही काही प्रमाणात शिल्लक आहे, ही वेदनापूर्वक वास्तवता आहे.

ते पुढे म्हणाले, आज भारतीय मनातील जास्तीव्यवस्था संपविण्यास प्रयत्न सुरु आहेत. बाबासाहेबांचे कर्तृत्व हे बुद्धधीवादावर उभारलेले आहे. अनेक चळवळींमध्ये बाबासाहेबांसोबत केवळ दलित नव्हे, तर सवर्ण व्यक्ती देखील उभे होते. माणूसपणाचा हक्क मिळविण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, रविवार, दिनांक २४ एप्रिल पर्यंत दररोज रात्री ८ वाजता आॅनलाईन माध्यमातून व्याख्यानमाला होत आहे. व्याख्यानमालेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्त्री सक्षमीकरण या विषयीचे विचार, डॉ.आंबेडकरांचे संविधान समितीमधील योगदान, डॉ.आंबेडकर आणि संविधान, डॉ.आंबेडकरांचे शेतीविषयक विचार, डॉ.आंबेडकर यांचे परराष्ट्र धोरण व राष्ट्रीय सुरक्षेविषयी विचार, लोकशाहितील अभिव्यक्ती स्वातंत्र्य, घटनात्मक आर्थिक समतचे उद््दीष्टय आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजना, डॉ.आंबेडकर यांचे आर्थिक विचार आदी विषयांवर नामवंत वक्ते आपले विचार मांडणार आहेत. जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या https://www.youtube.com/c/JadhavarGroupAdvShardulraoSudhakarraoJadhavar या यू टयूब पेजवरुन ही व्याख्याने प्रसारित होणार आहेत. सर्व व्याख्याने विनामूल्य असून विद्यार्थी व तरुणाईने मोठया संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: