लतादीदी गेली आणि अवकाशाएवढी पोकळी निर्माण झाली – पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केल्या भावना

पुणे : लतादीदी ही सर्वांसाठी भारतरत्न, स्वरसम्राज्ञी असेल, पण माझ्यासाठी ती माझी दीदी होती. वडील गेले तेव्हा त्यांना पाहिले आणि मी रडत होतो. त्यावेळी मी साडेचार वर्षांचा होतो. आणि आई गेल्यानंतर देखील दीदी च माझ्या पाठीशी उभी राहिली. आता दीदी गेली तेव्हा पुढे अंधार दिसतो, ही माझ्या मनाची आज अवस्था आहे. त्यामुळे ती गेल्यावर आकाशाएवढी नव्हे तर, माझ्यासाठी अवकाशाएवढी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित संगीत महोत्सवाची सांगता झाली. पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सहका-यांचा सांगीतिक कार्यक्रम दुस-या सत्रात, तर, पहिल्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे शास्त्रीय गायन झाले.

पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आयोजित संगीत महोत्सवात मी ३६ वर्षे गात आहे. सुरुवातीला रात्री उशीरा संगीत मैफल सुरु होत असे. त्याबद्दल अनेक आठवणी आहेत. रात्री १० वाजता आलेले रसिक पहाटे ४.३० ते ५ पर्यंत कार्यक्रमाला थांबत असत. आज जशी खुर्चीची व्यवस्था आहे, तशी त्याकाळी नव्हती. भारतीय बैठकीत हे श्रोते सलग कित्येक तास कार्यक्रमाकरिता बसत होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात लतादीदी यांना आवडणारी गीते सादर करण्यात आली. मधुरा दातार, प्राची देवल, अमेय जोग, विभावरी आपटे, मनीषा निश्चल, डॉ. उन्मेष करमरकर यांनी गायन केले. तर, अमर ओक, केदार परांजपे, विवेक परांजपे, डॉ.राजेंद्र दूरकर, प्रतीक गुजर आदिंनी साथसंगत केली.

पहिल्या सत्रात पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी पं. भीमसेन जोशी यांचे रघुवीर तुमको मेरी लाज हे गीत सादर केले. तसेच शास्त्रीय संगीतातील काही रचना सादर केल्या. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल या गाण्याने त्यांनी पहिल्या सत्राचा समारोप केला. प्रकाश पायगुडे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: