जागतिक बाल पुस्तक दिनानिमित्त ग्रंथभेट
पुणे : दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक व माध्यमिक मराठी व इंग्रजी शाळेतील मुलांना ‘जागतिक बाल पुस्तक दिना’ च्या औचित्याने मनोरंजनात्मक परीकथा, जादूच्या गोष्टींच्या पुस्तकांचे वाटप करत ‘मनोरंजनाकडून ज्ञानवृध्दीकडे’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
जगातील पहिला परिकथाकार हँन्स ख्रिस्तीयन अँडरसन यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरात 2 एप्रिल हा दिवस ‘बाल पुस्तक दिन’ म्हणून साजरा होतो. त्या निमित्ताने वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी कार्यरत संदर्भ ग्रंथपाल व माहितीतज्ज्ञ प्रसाद भडसावळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.
या संदर्भात बोलताना भडसावळे म्हणाले, ‘शाळा सुरु झाल्या. पण मुलांना अभ्यासाकडे वळविण्यासाठी मनोरंजक गोष्टींची पुस्तके अतिशय उपयोगी ठरत आहेत. परिक्षेनंतरचा काळ मुलांना वाचनासाठी प्रेरित करण्यास योग्य आहे हे लक्षात घेउन त्यांना आवडतील अशा ‘मनोरंजक पुस्तकांच्या वाचनातून ज्ञानवृद्धीकडे’ असा उपक्रम राबविला जात आहे.
उपक्रमासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे, अभिनेते दिलीप प्रभावळकर, गायक मिलिंद इंगळे, प्राजक्ता प्रभुणे यांनी गोष्टीची पुस्तके भेट दिली. या प्रसंगी प्रसाद भडसावळे, प्राजक्ता प्रभुणे, दीपमाला धायगुडे, कविता गुप्ता, वर्षा किराड, जयश्री मुथय्या, अपर्णा जगताप, उत्तम साळवे, मनीषा गायकवाड आदि उपस्थित होते. हेल्पिंग हॅन्डस् संस्थेच्या प्राजक्ता प्रभुणे यांनी मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून दिले. अत्रे शाळेसोबतच भीमनगर वस्ती परिसरातील मुले व त्यांचे पालकांनाही पुस्तकांचे वाटप करण्यात आले.