fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

‘चंद्रमुखी’तील ‘दौलत’ आला समोर

विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा टिझर काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर झळकला.  त्या टिझरमध्ये कोणत्याच कलाकाराचा चेहरा समोर न आल्याने ही उत्सुकता अधिकच वाढली. टिझरमध्ये पिळदार शरीरयष्टी असणारा पाठमोरा ‘तो’ ध्येयधुरंदर राजकारणी दिसत आहे. हा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अखेर या प्रश्नाला पूर्णविराम देत ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांसमोर आली आहे. महाराष्ट्रातील एक असा नेता जो समाजाच्या हितासाठी, प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असणारा, महाराष्ट्राची लोककला जपणारा, त्यांचे हक्क मिळवून देणारा आणि आपल्या ध्येयपूर्तीसाठी धडपडणारा ‘दौलत देशमाने’ आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे.

अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन्स प्रस्तुत, फ्लाइंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, लाइटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले असून पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. तर या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. ‘चंद्रमुखी’ येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात आपल्या भेटीला येणार आहे.

आदिनाथ कोठारे भूमिकेबद्दल म्हणतो, ”निर्मिती, दिग्दर्शन, बॉलिवूड चित्रपट केल्यानंतर आता बऱ्याच काळाने आपल्या भाषेत अभिनय करत आहे आणि त्यातही इतकी दमदार भूमिका साकारण्याची संधी मिळतेय, त्यामुळे यापेक्षा वेगळा आनंद कोणता असूच शकत नाही. भूमिकेबद्दल सांगायचे तर यापूर्वीही मी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. मात्र ही भूमिका खूप वेगळी आहे. एक असा राजकारणी ज्याची आयुष्यात काही ध्येय आहेत. तो समाजकल्याणासाठी, हक्कांसाठी लढत, धडपडत आहे. त्याच्या या धडपडीला यश मिळेल का, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. प्रसाद ओक यांच्यासोबत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव आहे. व्यक्तिरेखेबद्दलची प्रतिमा त्यांच्या डोक्यात निश्चित असल्याने समोरच्याकडून अपेक्षित आणि उत्तम अभिनय ते करून घेतात. माझ्या ह्या भूमिकेसाठी मी घेतलेल्या मेहनतीविषयी सांगायचे तर, प्रत्येक कलाकाराला कोणतीही भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेशी समरस होण्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास करावाच लागतो. तसाच ह्या व्यक्तिरेखेच्या देहबोलीचा, वागण्यातील करारीपणाचा अभ्यास मी नक्कीच केला.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading