fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पायाभूत सुविधा निर्मितीत अभियंत्यांनी योगदान द्यावे: डॉ. भागवत कराड

पुणे : ‘देश पुढे २५ वर्षांनी कसा असेल, हे डोळयासमोर ठेऊन नियोजन चालू आहे.विकास आणि तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. त्यासाठी प्रधानमंत्री गती शक्ती योजना आहे. मोठया प्रमाणावर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जात आहे. त्यात अभियंत्यांना मोठे योगदान देण्याची संधी आहे. त्यासाठी अशा चर्चासत्रातून संशोधन व्हावे ‘, अशी अपेक्षा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज व्यक्त केली.

इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे चॅप्टर तर्फे ‘जिओटेक्निकल इंजिनिअरिंग- काल, आज आणि उद्या’ या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्रात शुक्रवारी दुपारी ते बोलत होते. या चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला.

डॉ. भागवत कराड , डॉ. नितीन करमळकर, भाजपचे शहर संघटन सचिव राजेश पांडे, सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते , संयोजन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांच्या हस्ते चर्चासत्राच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

डॉ. कराड म्हणाले, ‘ समाज घडविण्याचे काम उच्चशिक्षित मंडळींचे आहे. अभियंते, डॉक्टर होणे आजही महत्वाचे मानले जाते. उच्च शिक्षितांनी आपल्या ज्ञानाचा फायदा इतरांना द्यावा. ‘

हे चर्चासत्र 11 मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी सहा या वेळात हॉटेल शेरेटन ग्रँड,पुणे येथे पार पडले.

दरम्यान, या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. या उदघाटन समारंभास मेजर जनरल एस एन मुखर्जी (माजी कुलगुरू,एल एन यु पी ई -ग्वाल्हेर ),प्रा.डॉ.एन. के.समाधिया ( अध्यक्ष, इंडियन जिओलॉजिकल सोसायटी, दिल्ली ) यांची विशेष उपस्थिती होती.

इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विकास पाटील, माजी अध्यक्ष रमेश कुलकर्णी,
संयोजन समिती सदस्य डॉ.कृष्णय्या शिवा(उपाध्यक्ष),सुमन जैन(मानद सचिव),अन्नपूर्णी अय्यर (सहसचिव) ,सुनील भावसार, डॉ. रवींद्र नलावडे, डॉ. सारिपुत नवघरे, विद्या जोशी, दीपाली जुनागडे, दीपाली कुलकर्णी, प्रा.आर.आर. सोरटे सभागृहात उपस्थित होते.

जिओ टेक्निकल इंजीनियरिंग क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ञ डॉ.बी.जे.कसमळकर आणि व्ही.व्ही. अभ्यंकर यांच्या सन्मानार्थ आणि 90 व्या वाढदिवसानिमित्त हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले . त्यांचा सत्कार करण्यात आला. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले,क्रांती शहा यांनी सूत्रसंचालन केले. सुमन जैन यांनी आभार मानले.

डॉ. नितीन करमळकर म्हणाले, ‘या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठांचा सन्मान करण्याची कल्पना चांगली आहे.

पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जिओटेक्नीकल एंजिनिअरिंग चे महत्व कायम राहणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात आय. ओ.टी. पासून अनेक नवे तंत्रज्ञान येत आहे. तरीही प्रत्यक्ष जमिनीवरील कामाचे महत्व कधीही कमी होणार नाही. त्या दृष्टीने ज्ञान अद्ययावत करण्यासाठी जिओटेक्नीकल इंजीनियरिंग सोसायटीचे प्रयत्न स्तुत्य आहेत. त्याचा तरुण पिढीने लाभ घेतला पाहिजे. ‘

माजी कुलगुरू मेजर जनरल एस.एन.मुखर्जी म्हणाले, ‘ जिओ टेक्नीकल क्षेत्रातील जगभरातील बदलांची नोंद घेणारे व्यासपीठ सतत कार्यरत राहिले पाहिजे. तरुण पिढीने हे क्षेत्र पुढे नेले पाहिजे. ‘

‘रॉक मेकॅनिक्स इन स्पेस एक्स्प्लोरेशन,केस स्टडीज ऑफ ब्रिज फाउंडेशन्स इन महाराष्ट्र,कन्स्ट्रक्शन ऑफ डायफ्रॅम वॉल,अंडरग्राउंड मेट्रो -येस्टर्डे,टुडे,टुमारो,एमआयएफ बेस्ड लेयर कोएफीशंट्स फॉर डिझाईन ऑफ गिओग्रिड अँड जिओसेल -रिइन्फोर्समेंट फ्लेक्झिबल पेव्हमेंट्स,स्लोप फेल्युअर अँड रोकफॉल मिटिगेशन वर्क्स ऑन कोकण रेल्वे’ अशा विषयांवर तांत्रिक मांडणी करण्यात आली . जिओटेक्निकल इंजिनियरिंग क्षेत्रातील व्यावसायिक,तज्ज्ञ,अभ्यासक, १०० आजीव सदस्य आणि विद्यार्थी या चर्चासत्रात उपस्थित होते.
या चर्चासत्रामध्ये एम.हिरेमठ,विकास रामगुडे,एस आर गांधी,डॉ.कुमार पिचुमणी,डॉ.शिरीष सरोदे,एल.प्रकाश,डॉ केतन गोखले या मान्यवर तज्ज्ञ मंडळींनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading