fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपत्तीचा मुकाबला करण्याचा शासन प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री 

पुणे : नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असून याकरीता येत्या काळात टप्याटप्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत राज्यातील मनपा व राज्य आपत्ती प्रतिसाद दलासाठी १८ शीघ्र प्रतिसाद वाहनांच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, विभागीय आयुक्त सौरभ राव, नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री म्हणाले, गेल्या काही वर्षात निसर्गाचे ऋतूचक्र बदलले असून अवकाळी पाऊस, गारपीट, चक्रीवादळासारख्या घटना घडत आहे. याचा फटका शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, पशु-पक्षी यांना बसत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने येणाऱ्या आपत्तीची पूर्वसूचना मिळते. आपत्तीमुळे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज आणि तत्पर असण्यासोबत कमीत कमी वेळेत ठिकाणी पोहोचली पाहिजे. आपत्तीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचे पुनवर्सन करण्यासाठी ११ हजार ७५० कोटी रुपये लागले आहेत. आपत्तीचा मुकाबला करण्याकरीता येत्या काळात टप्प्या टप्प्याने महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच नियोजन करण्यात येईल.

आर्यन पंम्पस्सारख्या नवीन उद्योगाच्या माध्यमातून यश मिळवून मराठी माणूस राज्याचे नाव जागतिक पातळीवर कोरण्याचे काम करीत आहे, याबद्दल अभिमान वाटत असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

आपत्तीत नागरिकांचा जीव वाचविण्याला सर्वोच्च प्राधान्य – विजय वडेट्टीवार

आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागात शीघ्र प्रतिसाद अग्निशमन वाहन उपलब्ध होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. देशात महाराष्ट्र कोणत्याही संकटास तोंड देण्यासाठी समर्थ आहे. जागतिक पातळीवरील गरज लक्षात घेऊन मराठी उद्योजक काम करीत असल्याचा अभिमान वाटतो. पूरपरिस्थितीच्या वेळी नागरिकांना तात्काळ मदत मिळण्याचादृष्टीने वाहनाची निर्मिती करावी, असे आवाहन मदत व पुनवर्सनमंत्री वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी स्वतःचे जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या पुणे मनपाचे सुनील शंकर, ठाणे मनपाचे संतोष कऱ्हाळे आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अरविंद सावंत यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading