fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

चंद्रकांत पाटील यांनाही महापालिकेऐवजी अजितदादांकडून जास्त अपेक्षा असाव्यात – प्रशांत जगताप

पुणे : जिल्ह्याच्या आढावा बैठकीमध्ये आमच्या लोकांच्या प्रश्नांना स्थान नाही. आमच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवली जाते,’ असं काही तरी कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं आहे. अधूनमधून अशी विधानं करायची आणि त्यातून चर्चेत राहायचं, या त्यांच्या स्वभावाला धरून त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. पण, या त्यांच्या विधानात वेगळीच मेख आहे, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला पाहिजे. चंद्रकांत पाटील यांनाही कदाचित महापालिकेऐवजी अजितदादांकडून जास्त अपेक्षा असाव्यात असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी चंद्रकांत पाटील आणि भाजपला लगावला आहे.

आढावा बैठक असो किंवा कोणतीही चर्चा, एखाद्या प्रश्नावर तत्काळ उत्तर मिळणार, असा राज्यातील आघाडीचा नेता म्हणजे अजितदादा पवार. चंद्रकांत पाटील यांनाही कदाचित महापालिकेऐवजी अजितदादांकडून जास्त अपेक्षा असाव्यात, हेच स्पष्ट होते. कोणतेही काम योग्य असेल, नियमांच्या चौकटीत होण्यासारखे असेल, तर अजितदादा पवार कोणताही मुलाहिजा न ठेवता, कोणताही विचार न करता त्याला मंजुरी देतात. काम होण्यासारखे नसेल, तर काम होणार नाही, या स्पष्ट शब्दांमध्ये सांगतात, ही गोष्ट सर्व राज्याला माहीत आहे. मात्र, चंद्रकांत पाटील नुसती दिशाभूल करत आहेत, हे स्पष्ट आहे. राहता राहिला प्रश्न आढावा बैठकींचा, तर गेल्या दोन वर्षांमध्ये चंद्रकांत पाटील किती काळामध्ये आढावा बैठकींना हजर राहिले आणि कोथरुडचे किती प्रश्न त्यांनी मांडले, याचा त्यांनीच विचार करावा. तब्बल दोन वर्षे या बैठकांना गैरहजर लावून, आता हेच आमदार अजितदादा प्रश्न मार्गी लावत नाहीत, अशी तक्रार करत आहेत, यातून त्यांना काय साध्य करायचे आहे, त्यांनाच माहीत.

राहता राहिला प्रश्न कोथरुडच्या प्रश्नांचा. पुणे महापालिकेत सत्ता आहे भाजपची. चंद्रकांत पाटील आहेत पूर्णपणे पुणे शहरातच असणाऱ्या कोथरुड मतदारसंघाचे. महापौर मुरलीधर मोहोळ कोथरुडमधूनच नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पुण्याच्या जनतेने मोठ्या विश्वासाने त्यांच्याकडे सत्ता दिली. असे असतानाही, कोथरुडचे प्रतिनिधित्व करत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना त्याच भागात राहणाऱ्या महापौरांकडून अपेक्षित कामे करून घेता येत नाहीत, यात अपयश कोणाचे? कोण कोणाच्या प्रस्तावांना केराची टोपली दाखवत आहे, हे जगजाहीर आहे. पण, आता महापालिका निवडणूक काही दिवसांवर आली आहे. पाच वर्षांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून पुण्यामध्ये काय कामं झाली आणि कोणत्या कामांची फक्त चर्चाच झाली, हे जगजाहीर आहे. मात्र, त्यावर पांघरुण घालायचे आहे, झालेच तर आपल्याच पक्षातील पदाधिकारी योग्य काम करत नाहीत, हे अप्रत्यक्ष सांगायचे आहे, असे अनेक पक्षी एका दगडात मारण्याचा प्रयत्न चंद्रकांत पाटील करत आहेत.

सतत ट्विटरवर येऊन वाद निर्माण करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडचा कोणता प्रश्न हाती घेतला, तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला, हे कधीतरी जाहीरपणे सांगावे. मुळात, स्वतः प्रदेशाध्यक्ष असताना यांना सुरक्षित मतदारसंघाचा शोध होता. यासाठी मेधाताई कुलकर्णी यांसारख्या आपल्याच पक्षाच्या आमदाराचे तिकीट कापून तेथून निवडून आले. म्हणजे पक्षाच्याच कार्यकर्त्यांचे तिकीट कापून निवडून येणारा हा नेता. म्हणजे चंद्रकांत पाटलांनी ना पक्षाला, पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय दिला, ना कोथरुडच्या जनतेला. पण, तरीही त्यांचा आविर्भाव कसा, तर म्हणे, ‘गोव्यात किंवा अन्य राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस डिपॉझिट जप्त करण्यासाठी निवडणूक लढवतात.’ चंद्रकांत पाटील, आम्ही आमची पक्ष संघटना वाढवण्यासाठी निवडणुका लढवत आहोत आणि त्यासाठी आम्ही गोव्यातही निवडणूक लढवू. पण, तुम्ही एकदा तरी कोथरुडसारखा सुरक्षित मतदारसंघ सोडून अन्य मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा तरी विचार करावा. तुमच्यासारख्या आपल्याच कार्यकर्त्यांचे पंख कापण्याचा आमचा स्वभाव नाही. जनतेच्या विकासाची कामे अडवण्याची शिकवण आमच्या पक्षात नाही. त्यामुळे, अजितदादा किंवा आमचा कोणताही नेता कामे अडवतो, अशी टीका करण्यापेक्षा मूळात आपण आपल्या कामांना किती न्याय देतो, याचे नीट आत्मपरीक्षण करून पाहावे. असेही जगताप यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading