fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

‘इंडिया स्कील्स २०२२’ स्पर्धेत क्रेडाई पुणे मेट्रो – कुशलतर्फे प्रशिक्षित कामगारांचे दैदिप्यमान यश

– चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व

पुणे : क्रेडाई पुणे मेट्रो – कुशल या उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात आलेल्या विविध राज्यातील आठ बांधकाम कामगारांनी ब्रिकलेइंग आणि वॉल फ्लोर टाईलिंग या प्रकारात ‘इंडिया स्कील्स २०२२’ या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळविले.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई)यांच्या वतीने नवी दिल्ली येथील तालकटोरा इनडोअर स्टेडियम या ठिकाणी पार पडलेल्या या स्पर्धेत क्रेडाई पुणे मेट्रो – कुशलतर्फे प्रशिक्षित कामगारांनी २ सुवर्ण, चार रौप्य तर दोन उत्कृष्टता पदके पटकाविली.

या स्पर्धेत सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या ओडिशातील मोनीश कमल आणि महाराष्ट्रातील संजीव कुमार सबावथ यांना ऑक्टोबर २०२२ मध्ये चीनमधील शांघाय येथे होणाऱ्या वर्ल्ड स्किल्स स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे हे विशेष. स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी रोख रुपये एक लाख, तर रौप्य पदक विजेत्यांना रोख रुपये ७५ हजार देत गौरविण्यात आले.

क्रेडाई पुणे मेट्रो अंतर्गत कुशल या उपक्रमाद्वारे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रासह केरळ, ओडिशा, बिहार, मध्यप्रदेश, तेलंगणा या सहा राज्यांतील एकूण १२ बांधकाम कामगारांना नुकतेच विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. स्पर्धेत विजयी झालेल्या ८ कामगारांमध्ये ४ कामगार हे ब्रिकलेइंग प्रकारात तर चार कामगार हे वॉल फ्लोर टाईलिंग प्रकारात प्रशिक्षित करण्यात आले होते.

रौप्य विजेत्या स्पर्धकांमध्ये २ कामगार हे केरळचे असून २ कामगार ओडिशाचे आहेत. तर मध्यप्रदेश व केरळ येथील प्रत्येक एक अशा दोन कामगारांनी स्पर्धेत उत्कृष्टता पदक पटकाविले आहे. या प्रकारच्या बांधकाम क्षेत्राशी संबंधित स्पर्धेत अभियांत्रिकी क्षेत्राची पार्श्वभूमी असलेल्या ३ महिला स्पर्धक सहभागी झाल्याचे या वेळी पहिल्यांदाच पहायला मिळाले.

क्रेडाई कुशल मार्फत पार पडलेल्या प्रशिक्षणाची खासियत म्हणजे या वेळी बांधकाम कामगार स्पर्धकांना रोहीम मोमीन आणि मोहम्मद रबीथ या २०१९ साली वर्ल्ड स्कील स्पर्धेत उत्कृष्टता पारितोषिक पटकाविलेल्या विजेत्यांकडून आणि पल्लवी कोठारी या कुशल उपक्रमाच्या प्रशिक्षक प्रमुखांकडून ब्रिकलेइंग आणि वॉल फ्लोर टाईलिंगचे तब्बल महिनाभर प्रशिक्षण मिळाले होते. शिवाय वर्ल्ड स्कील स्पर्धेची संपूर्ण माहिती असलेले आणि कुशल या उपक्रमाचे अध्यक्ष जे पी श्रॉफ, सदस्य मिलिंद तलाठी व कवीश ठकवानी यांचेही विशेष मार्गदर्शन मिळाले.

स्पर्धेदरम्यान २६ राज्यांमधून ५४ कौशल्य प्रकारामध्ये सहभागी तब्बल १५० स्पर्धकांचा  कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading