fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRA

वक्फ नोंदणीकृत संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर पावले उचलणार -अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक

मुंबई : वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रस्ट आणि संस्थांकडून मुस्लिम समाजहिताचे कार्य केले जाते. पण काही अपप्रवृत्तींकडून याचा गैरफायदा घेतला जातो. अशा अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच वक्फ मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांमधील गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाकडून कडक पावले उचलली जातील. अशा अपप्रवृत्तींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

परतूर नगरपरिषद हद्दीतील आणि महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेल्या एका संस्थेकडील इनामी जमिन बेकायदेशीर रित्या विकल्या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक बोलत होते.

नवाब मलिक म्हणाले की, अशा गैरव्यवहारांचा शोध घेऊन त्याबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना विभागाच्या तसेच वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. मागील २ वर्षात वक्फ इनाम जमिनी बेकायदेशीररित्या खालसा करणे, विक्री करणे, अवैधरित्या मावेजा घेणे, अवैध भाडेपट्टीवर देणे या कारणास्तव राज्यातील विविध ठिकाणी ७ प्रकरणांमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या पुढाकाराने एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. आष्टी (जि. बीड) येथील एका प्रकरणात उपजिल्हाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. वक्फ मंडळामार्फत राज्यातील संस्थांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी मागील २ वर्षात कार्यवाही करण्यात आली आहे. राज्यात वक्फ मंडळांतर्गत सुमारे ३० हजार संस्था नोंदणीकृत असून त्यांचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी वक्फ मंडळामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती मंत्री मलिक यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading