नाट्यछटांचे सादरीकरण घराघरातून व्हावे – प्रकाश पारखी

‘मराठीतील निवडक नाट्यछटा’ या ई-बुकच्या पहिल्या भागाचे प्रकाशन

पुणे : नाटक हे व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्वाचे साधन आहे, तर नाट्यछटा हे त्याचे मूळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश पारखी यांनी केले. नाट्यछटा सादरीकरण घराघरातून झाल्यास मुलांना नाटकाची गोडी लागेल असे सांगतानाच चाळीस वर्षांहून अधिक काळ नाट्यचळवळ सुरू ठेवल्याने व्यावसायिक रंगभूमीला प्रेक्षक मिळाले याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

25 नाट्यछटांचा संग्रह असलेल्या ‘मराठीतील निवडक नाट्यछटा’ या ई-बुकच्या पहिल्या भागाचे प्रकाशन आज पारखी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी नाट्यनिर्मात्या आणि अभिनेत्री भाग्यश्री देसाई, मराठी भाषेचे अभ्यासक कवी शंतनू खेर यांची प्रमुख उपस्थिती होती. विस्तार संस्थेच्या संचालिका जान्हवी बोरावके यांच्या पुढाकारातून या ई-बुकची निर्मिती आणि प्रकाशन करण्यात आले असून संपादनाची बाजू रंगकर्मी देवेंद्र भिडे यांनी सांभाळली आहे.

प्रकाश पारखी म्हणाले, नाटकाचे छोटे रूप म्हणजे नाट्यछटा. दिवाकरांच्या संकल्पनेतून नाट्यछटांची निर्मिती झाली. कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नाट्यछटा सादर करू शकते. बालनाट्य, नाट्यछटा याद्वारे प्रेक्षक घडविण्याचे कार्य करतो आहे. त्यामुळे नाट्यछटा लेखन आणि सादरीकरणाची चळवळ पुढे गेली पाहिजे, अशी अपेक्षा पारखी यांनी व्यक्त केली.

पुस्तक हाती घेतल्यानंतर त्याचा स्पर्श, गंध यातून वेगळी अनुभूती मिळते पण बदलत्या काळाप्रमाणे, प्रवाहाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून भाग्यश्री देसाई म्हणाल्या, लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईनचे तंत्र प्रत्येकाने आत्मसाद केले आहे त्यामुळे ई-बुकची कल्पना रसिकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. अद्ययावतर नाट्यगृहांची निर्मिती झाल्यास नाटकांकडे प्रेक्षकवर्ग निश्चित आकर्षिला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शंतनू खेर म्हणाले, प्रेक्षक-रसिकांचा लक्ष कालावधी (अटेंशन स्पॅन) कमी झाला असून लघु कथा किंवा संक्षिप्त स्वरूपातील साहित्य वाचण्याकडे ओढा वाढला आहे. कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त आशय पोहोचविणे हे नाट्यछटेचे वैशिष्ट्य आहे. दृक-श्राव्य माध्यमातील सादरीकरण आजच्या पिढीला जास्त आवडते या मुद्द्याकडे लक्ष वेधताना यात सांस्कृतिक मूल्ये असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: