fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक – पोलीस उपायुक्त रोहिदास पवार

पुणे :”पोलीस दलात काम करत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अधिकारी – कर्मचारी यांच्यासह समाजातील सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असते. पुणे शहर विभागातील परिमंडळ चार हा विभाग संवेदनशील असून चांगल्या कामाची प्रशंसा तर बदमाशी केल्यास कारवाई करणार असल्याचे मत, परिमंडळ चारचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी व्यक्त केले. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांचा निरोप समारंभ तसेच नवनियुक्त पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांचे स्वागत येरवडा पोलीस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी येरवडा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, चतुर्श्रुंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रमेश गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख (येरवडा), अजय वानखेडे (विश्रांतवाडी), राजकुमार वाकचौरे (चतुर्श्रुंगी), दत्तात्रय चव्हाण (खडकी) यांनी मनोगत व्यक्त केले. परिमंडळ चार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा यावेळी “विशेष सन्मान” करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना पोलीस उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, “मागील बावीस महिन्यांपासून परिमंडळ 4 विभागाचा कार्यभार सांभाळला. हा विभाग संवेदनशील असून कायदा-सुव्यवस्थे सोबतच इतर अनेक आव्हाने होती. दोन जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केल्यामुळे त्या अनुभवाचा पुणे शहरात उपयोग झाला. या कालावधीत कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच कोविडमध्ये नागरिकांना चांगली मदत करता आली. तसेच नवीन लोणीकंद पोलिस स्टेशन सुरु करता आले.पोलीस दलात काम करत असताना “न्याय”देण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी आपल्याकडे असते. सर्वांना न्याय देणे हे आमचे मुख्य काम असून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पडण्याचा प्रयत्न करावा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले. “हद्दीत माझी खूपच हवा आहे असे लोक म्हणतात.” माझी सप्टेंबर मध्येच बदली झाली होती. प्रशासकीय कारणास्तव महिनाभर थांबावे लागले. त्यामुळे हितचिंतकांना माझा आणखी सहवास लाभला. महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा मदतीला बोलावले तर अवश्य येऊ, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.

पोलीस उपायुक्त देशमुख यांची अखेरपर्यंत दहशत कायम…
पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी डिसेंबर 2019 मध्ये परिमंडळ 4 असे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्याआधी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी अत्यंत समर्थपणे पार पाडली. येरवडा येथील सुसज्ज अशा वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाची निर्मिती त्यांच्याच पुढाकारानेच झाली. बावीस महिन्यांच्या कालावधीत सहा टोळ्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई त्यांनी केली. एकूण 94 सराईत आरोपींना तडीपार करून 9 गुन्हेगारांवर एमपीडीए नुसार कारवाया केलेल्या आहेत. पुणे शहरातील सर्वाधिक कारवाया परिमंडळ चार विभागात करण्यात आलेले आहेत. पोलीस उपायुक्त देशमुख यांची कडक शिस्त, कोणत्याही दबावाला बळी न पडता करण्यात येणाऱ्या कठोर कारवाया, यासह गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर त्यांनी चांगलीच दहशत निर्माण केली होती. नव्याने आलेले पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांना हि सर्व आव्हाने स्वीकारावी लागणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading