fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन उपकरणांबाबत प्रशिक्षण द्या-डॉ.राजेश देशमुख

पुणे : शासकीय रुग्णालयांमध्ये  अग्निशमन उपकरणांच्या वापराबाबत तज्ज्ञांमार्फत प्रशिक्षण देण्यात यावे आणि आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत समन्वय करण्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा परीक्षणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण  आदी उपस्थित होते.

डॉ.देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांचे अग्निसुरक्षा आणि विद्युत परीक्षण यापूर्वीच करण्यात आले आहे. त्यात आढळलेल्या त्रूटी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात. शासकीय रुग्णालयांना त्रूटीची पूर्तता करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रुग्णालयांच्या सुरक्षा उपाययोजनांची अपूर्ण कामे 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावीत.

रुग्णालयात नवीन यंत्रणा स्थापित करताना त्यासाठी विद्युत यंत्रणेत आवश्यक बदलांकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्याबाबत तज्ज्ञ अथवा सक्षम यंत्रणेकडून तपासणी करून घ्यावी. अधिक विद्युत भार आवश्यक असलेल्या यंत्रांवर लक्ष देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी. दुर्घटना घडल्यास त्वरीत प्रतिसाद देण्यासाठी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. त्यासाठी महापालिका आणि पीएमआरडीएच्या अग्निशमन अधिकाऱ्यांची आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत शाखेचे सहकार्य घेण्यात यावे.

जिल्ह्यातील कोविड उपचाराची सुविधा नसलेल्या रुग्णालयांचेही अग्निसुरक्षा परीक्षण करण्यात यावे. या आठवड्यात आगीच्या घटनांना तात्काळ प्रतिसाद देता यावा यादृष्टीने आवश्यक पूर्वतयारीसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक तयार करावा. उपविभागीय अधिकारी स्तरावर येत्या दोन दिवसात खाजगी रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात यावी. 30 नोव्हेंबरपर्यंत परीक्षणात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्यास कारवाई करण्यात येईल याची स्पष्ट कल्पना त्यांना देण्यात यावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

कोविड व्यतिरिक्त उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे परीक्षण करून विद्युत भार क्षमता आणि प्रत्यक्षात वापरला जाणारा भार यातील फरक लक्षात घ्यावा. परीक्षणात आढळलेल्या त्रूटी दूर करण्यासोबत विशिष्ट कालावधीत असे परीक्षण करण्यासाठी यंत्रणा तयार करावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रसाद यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading