fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

राज्यातील उद्योजकतेला कोणतीही आपत्ती रोखू शकत नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई : राज्यातील उद्योजक हे कायम उद्यमशिल राहिले आहेत. कोरोना काळातही अमेरिका, लंडन, जर्मनी, साऊथ कोरिया यासारख्या देशातील 60 कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे अनेक छोटे व्यवसाय थोड्याच कालावधीत मोठे झाले आहेत. आज लिस्टींग झालेले लघु व मध्यम उद्योगही लवकरच मोठे उद्योग म्हणून नावारुपाला येतील असा, विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

मुंबई शेअर बाजार (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज) येथे लघु मध्यम (एसएमई) गटातील आज 350व्या कंपनीचे नाव सूचीबद्ध (लिस्टींग) झाले त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौहान, एसएमई विभाग प्रमुख अजय ठाकूर हे  दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

देसाई पुढे म्हणाले, लघु आणि मध्यम कंपन्यांसाठी शासनाने अनेक योजना जाहीर केल्या आहेत. गेल्या नऊ वर्षात मुंबई शेअर बाजारात लिस्टींग असलेल्या या 349  कंपन्यांच्या माध्यमातून सुमारे 40 हजार कोटीच्या मालमत्ता निर्माणाचे कार्य झाले आहे.  यातील 115 कंपन्यांचे मुख्यालय महाराष्ट्रात आहे. ही अभिमानाची बाब आहे. इथे 50 व्या कंपनीचे, 300 व्या कंपनी चे लिस्टींगवेळी मी होतो आणि आज 350व्या कंपनीचे लिस्टींग माझ्या उपस्थितीत होत आहे. इथे लवकरच तीन हजाराव्या कंपनीचे लिस्टींग माझ्या उपस्थितीत व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

लघु मध्यम उद्योजकांच्या प्रगतीचा आढावा बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष कुमार चौहान यांनी घेतला. चौहान म्हणाले, आज देशातील शेतकऱ्यांच्या संख्ये एवढी संख्या ही शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची आहे. पूर्वी केवळ परिचितांच्या माध्यमातून उद्योजकांना मुद्दल जमा करावी लागत असे, आता संपूर्ण देशभरातून नवउद्योगातही गुंतवणूक येऊ लागली आहे. आतापर्यंत लिस्टींग झालेल्या या लघु व मध्यम कंपन्यांपैकी बारा प्रकल्प हे स्टार्ट अप आहेत. बीएसई केवळ नियामक मंडळ म्हणून काम करणारी संस्था न राहता बीएसई मार्फत उद्योजकांसाठी इन्क्युबेशन केंद्र चालविले जाते, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आज लिस्टींग झालेल्या एसएमई मध्ये व्यंकटेश रिफायनरी ही 350वी कंपनी ठरली आहे. त्याच बरोबर समोरा रिऍलिटी लिमीटेड, बी लाईन फायनान्शीयल सर्व्हीसेस या कंपन्यांचेही आज लिस्टींग झाले. सन 2012 पासून सेबीच्या मान्यतेने एसएमई कंपन्यांचे  लिस्टींग केले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading