fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

24 ते 30 सप्टेंबर दरम्यान विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात सरीसरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

पुणे:विदर्भ, उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात गेल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस पडला. तर उर्वरीत राज्यातही कमी-अधिक पावसाने हजरी लावली आहे. राज्यात सध्या हलका ते मध्यम पाऊस पडत असून, २४ ते ३० सप्टेंबर या आठवडाभराच्या कालावधीत विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात सरासरीपेक्षा अधिक, तर पश्चिम महाराष्ट्रात सरीसरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

ऑगस्ट महिन्यातील दडीनंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीपासून राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस पडत आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला आहे. पूर्व आणि मध्य भारतातील कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे आलेला मॉन्सूनचा आस या प्रणालींमुळे गेल्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे वगळता राज्याच्या बहुतांशी भागात चांगला पाऊस झाला.

१६ ते २२ सप्टेंबर या कालावधी पडलेल्या सरासरी पावसाचा विचार करता उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक होते. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आठवड्याच्या सरासरीच्या तुलनेत १८३ टक्के अधिक पाऊस पडला. नागपूर जिल्ह्यात १३६ टक्के अधिक, गोंदिया जिल्ह्यात १०८ टक्के अधिक तसेच ठाणे जिल्ह्यात १०३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, कोकणातील पालघर, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडला. रत्नागिरी, नाशिक, नंदूरबार, वाशीम, परभणी जिल्ह्यात पावसाने सरासरी गाठली आहे.

तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यामध्ये आठवडाभरात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजेच उणे ९७ टक्के पाऊस पडला. तसेच धुळे जिल्ह्यात उणे ८७ टक्के, सातारा उणे ७४ टक्के, सोलापूर उणे ७१ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात उणे ६८ टक्के पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, विदर्भातील अमरावती अकोला जिल्ह्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे हवामान विभागाच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading