fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETECHNOLOGY

एआरएआयने विकसित केले इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या स्वदेशी चार्जरचे तंत्रज्ञान  

पुणे : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधेचा विचार करीत पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने स्वदेशी प्रोटो टाईप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असल्याची माहिती एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

एआरएआयच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले असून याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. मथाई बोलत होते.एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे, आनंद देशपांडे, उपसंचालक विजय पंखावाला, परिषदेचे मुख्य संयोजक डॉ. सुकृत ठिपसे, सह संयोजक बी. व्ही. शामसुंदर आदी या वेळी उपस्थित होते.

स्वदेशी प्रोटो टाईप चार्जर सिस्टीम तंत्रज्ञानाबद्दल अधिक माहिती देताना डॉ. मथाई म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेले चार्जर्स हे प्रामुख्याने बाहेरील देशामधून आयात करण्यात येतात. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारत व मेक इन इंडिया या उपक्रमांमध्ये सहभागी होत आता एआरएआयने लाईट ईव्ही एसी चार्ज पॉईंट तंत्रज्ञान विकसित केले आहे. सदर तंत्रज्ञान हे भारत चार्जर्स स्टॅण्डर्स, कॅडेमो (CHAdeMO), सीसीएस (कंबाईन्ड चार्जिंग सिस्टिम्स) यांच्या तोडीचे आहे. याद्वारे भारतीय कंपन्यांना आता या स्वदेशी चार्जरचे उत्पादन करता येणे शक्य होणार असून हे चार्जर देखील स्थानिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे.”

याबद्दल अधिक माहिती देताना आनंद देशपांडे म्हणाले की, एआरएआयने विकसित केलेल्या तंत्रज्ञानावर आता  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीच्या वतीने भारत एसी ००१ या पहिल्या चार्जरची निर्मिती केली जाणार आहे. यासाठी आवश्यक टेस्टिंग हे एआरएआय प्रयोगशाळेत पूर्ण झाले असून त्याचा अनुपालन अहवाल (कम्प्लायंस रिपोर्ट) देखील कंपनीच्या उच्चपदस्थ अधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील हा पहिलाच चार्जर असून या आधी एका खासगी संस्थेने हे तंत्रज्ञान एआरएआयकडून घेतले आहे.

एसी ००१ चार्जर हा एसी चार्जर असून चार चाकी गाड्यांसाठी त्याचा वापर करणे शक्य आहे. हा चार्जर सिंगल फेज असून त्याची बॅटरी २३० व्होल्ट १५ अॅम्पिअर इतक्या क्षमतेची आहे. हा चार्जर वापरल्यानंतर  किती वीज वापरली गेली, वाहन किती चार्ज झाले हे कळू शकणार आहे. याद्वारे घराबरोबरच महामार्गावर देखील वाहन चार्ज करणे शक्य होईल. याची सध्याची किंमत ही अंदाजे ५० ते ६० हजार रुपये इतकी असून भविष्यात टाईप २ प्रकारातील हाय पॉवर चार्जर्स सोबतच दुचाकी वाहनांसाठी चार्जर निर्मिती करण्याचा कंपनीचा विचार आहे.

याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या प्रमाणीकरणासाठी एआरएआयच्या चाकण येथील सेंटरमध्ये अॅडव्हान्स बॅटरी सेफ्टी लॅब असून या ठिकाणी इलेक्ट्रिक मोबिलिटी सेंटर, मोटार, चार्जर्स, बॅटरी टेस्टिंग, ट्रान्समिशन आणि गाड्यांच्या क्रॅश टेस्टिंग सुविधा उपलब्ध आहे.

नेहमीच्या टेस्टिंग बरोबरच इलेक्ट्रिक वाहनांसाठी क्रॅश टेस्टिंग हे महत्त्वाचे असून या टेस्टिंगमध्ये वायरिंग कनेक्टर्स, बॅटरी यांना इजा झाली आहे का यांकडे विशेष लक्ष देण्यात येते. क्रॅश टेस्टिंगनंतर पुढेल २४ तास वाहनाचे निरीक्षण करण्यात येते, यामध्ये आगीची कोणती घटना घडली आहे का याची कसून तपासणी करण्यात येते. याच ठिकाणी ३ मोटार टेस्ट बेड्स  असून एका वेळी ३ मोटारींचे टेस्टिंग होऊ शकते. या लॅबमध्ये एसी, डीसी अशा सर्व प्रकारच्या चार्जरचे टेस्टिंग होऊ शकते, इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी आवश्यक ट्रान्स्मिशन गिअरबॉक्स टेस्टिंग सेंटर (TGTC) देखील या ठिकाणी उपलब्ध आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading