fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केंब्रिज बोर्ड सुरू होणार   

पुढील शैक्षणिक वर्षात केंब्रिज बोर्ड सुरू करण्याचा विचार 

मुंबई :मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये केंब्रिज बोर्ड सुरू केला जाणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. तसेच देशात आणि जगात जे सर्वोत्तम असेल त्या पद्धतीचे शिक्षण मुंबईतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात आज सहमतीचा करार झाला. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समिती सभापती संध्या दोशी, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी, सह आयुक्त अजित कुंभार, केम्ब्रिज दक्षिण आशिया चे विभागीय संचालक महेश श्रीवास्तव, शिक्षण तज्ज्ञ फ्रान्सिस जोसेफ, केम्ब्रिज विद्यापीठ प्रेस हेड अजय प्रताप सिंग, महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मुंबई पब्लिक स्कुलमध्ये यापूर्वीच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे मोफत अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. आता केंब्रिज या आंतरराष्ट्रीय बोर्डाचा अभ्यासक्रमही सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आपल्या शाळांमध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांसारख्या इतर उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. शाळांच्या इमारती आणि पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यावरही महापालिकेचा भर आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच सहसाहित्यही मोफत पुरविण्यात येत आहे. या शाळांमधील दर्जेदार शिक्षणामुळे चालू शैक्षणिक वर्षात चार हजार विद्यार्थी संख्येसाठी दहा हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाल्याने लॉटरी पद्धत अनुसरावी लागली हे या शाळांचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

केंब्रिज हे जगातील दर्जेदार शिक्षणाचे माध्यम असल्याने त्यांच्या माध्यमातून मुंबईतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा उत्तम पर्याय उपलब्ध होईल, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. किती शाळांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करता येऊ शकेल याचा येत्या दोन महिन्यात अभ्यास करून पुढील शैक्षणिक वर्षात हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading