पीएमपी -भेकराईनगर आगारातील विकासकामांचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे : पीएमपीएमएलच्या भेकराईनगर आगारात अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, प्रवाशांच्या सोयीसाठी सुसज्ज बस स्थानक, पास केंद्र, वाहतूक नियंत्रण कक्ष व डेपोच्या आवारात वृक्षारोपण अशा सव्वा दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. नगरसेवक गणेश ढोरे यांनी महापालिकेतून निधी उपलब्ध करून सदरची विकासकामे पूर्ण केली.

कार्यक्रमास नगरसेवक गणेश ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, जि.प. सदस्या अर्चना कामठे, पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, कामगार व जनता संपर्क अधिकारी सतिश गाटे, भेकराईनगर आगार व्यवस्थापक दिपक वाळुंजकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात घरी बसून पगार घेतला नाही तर कोरोना प्रतिबंधासाठी नेमून दिलेली जोखमीची व जबाबदारीची कर्तव्ये चोखपणे बजावली. त्याबद्दल पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तसेच अवघ्या दोन वर्षांमध्ये नगरसेवक गणेश ढोरे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केल्याचा उल्लेख करून त्यांचेही कौतुक केले. नागरीकीकरण वाढत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने एक वृक्ष लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली पाहिजे,

पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे म्हणाले, पीएमपीएमएलचा भेकराईनगर डेपो हा आशिया खंडातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा ई-बस डेपो ठरला आहे, ही निश्चितच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भेकराईनगर आगारातून जेजुरी, रांजणगाव एमआयडीसी, यवत, निगडी, हिंजवडी इ. ठिकाणी स्मार्ट एसी ई-बसेसद्वारे संचलन सुरु आहे. येत्या काही दिवसात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ई-बस डेपो उभारले जाणार आहेत. पासकेंद्र सुरू करून रक्षाबंधन सणानिमित्त महिला प्रवाशांना पीएमपीएमएल तर्फे भेट देण्यात आम्हाला यश मिळाले. पासकेंद्र सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू असणार आहे. प्रवाशी  नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

नगरसेवक गणेश ढोरे म्हणाले, दोन वर्षांपासून पालिकेतून जास्तीत जास्त निधी आणून विकासकामे सुरू आहेत. भेकराईनगर आगार दगडखाण होती, त्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच या ठिकाणी सर्वत्र कचरा पसरलेला होता, तो स्वच्छ करून परिसर सुशोभित करण्यात यश आल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: