fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तोकडे कपडे घातल्याने दोन जोडप्यांवर हल्ला, मलंगगडच्या पायथ्याशी घडलेला प्रकार

सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल    

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील नेवली – हिल लाईन येथे फिरण्यासाठी गेलेल्या दोन जोडप्यांवर काही आरोपींनी हल्ला करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. तोकडे कपडे घातल्याने हल्ला केल्याचा आरोप सदर प्रकरणातील पीडितेने केला आहे. ही घटना रविवारी घडली असून सोशल मिडियावर या बाबतची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील चौघे रविवारी सुट्टी असल्याने सायंकाळच्या सुमारास मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेले होते. अचानक पाऊस आल्याने त्यांनी एका शेडचा आसरा घेतला. याठिकाणी उपस्थितीत असलेल्या आरोपींनी यातील दोन मुलींना छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अंगावरील कपडे ओडण्याचाही प्रयत्न केला. तसेच त्यांच्यासोबत असभ्य वर्तन केले. त्या मुलींसोबत असलेल्या दोन तरुणांना मारहाण केली. कसेबसे हे तरूण त्यांच्या तावडीतून सुटून नेवली पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाणे येथून त्यांना मेडिकल करण्यासाठी पत्र देण्यात आले होते. परंतु सदरील तरुण तेथे न जाता घरी गेले व त्यांनी सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट व्हायरल केली. यानंतर नेवली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना संपर्क करून गुन्हा नोंदवल्याची माहिती ठाणे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेवून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आरोपींना त्वरीत अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मेडिकल रिपोर्टला पीडितांना पाठवत असताना पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना का पाठवले नाही? असे विचारुन अशा घटनेत पीडितेसोबत मेडिकल करण्यासाठी पोलीस अधिकारी पाठविण्याची सूचना पोलिसांना दिल्या आहेत. तसेच दुर्गाडी किल्ला, मलंग गडच्या पायथ्याशी नागरिक मोठ्याप्रमाणात फिरण्यासाठी जात असतात. त्यामुळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना देखील डॉ.गोऱ्हे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading