fbpx
Thursday, April 25, 2024
BLOGLatest News

वनवासी कल्याणासाठी अहोरात्र झटणारा सच्चा कार्यकर्ता 

वनवासी कल्याणासाठी अहोरात्र झटणारा सच्चा कार्यकर्ता आणि वनवासी कल्याण आश्रमाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष जगदेव रामजी उराव यांचा १५ जुलै २०२१ रोजी पहिला स्मृतिदिन. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याला आणि आठवणींना दिलेला उजाळा…

– विनायक खाडे, वनवासी कल्याण आश्रम-पुणे
वनवासी कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत असताना गेल्या वर्षी १५ जुलैला छत्तीसगडमधील जशपूर येथे त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अत्यंत शांत, संयमी, निगर्वी, जनजातीच्या कल्याणाचा, त्यांच्या उन्नत्तीचा, सर्वांगीण विकासाचा रात्रंदिवस ध्यास घेतलेले, कार्यकर्त्यांबद्दल अत्यंत जिव्हाळा, प्रेम जपणारे आणि अत्यंत साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले जगदेव रामजी सर्वांसाठी आदर्श होते.
जगदेवजींचा जन्म १ ऑक्टोबर १९४९ रोजी छत्तीसगडमधील जशपूर जवळील कोमडो या गावी उराव जनजातीत झाला. वयाच्या १२ व्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले. नदी सागराला मिळावी, तसे ते संघ परिवाराशी मिळाले होते. बाळासाहेब देशपांडेंच्या सानिध्यात त्यांची जडण-घडण झाली. आश्रमाच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. बारावीनंतर तिथेच नोकरी करत ‘सीपीईडी’, ‘एमए’पर्यंत शिकले. विवेकानंद महाविद्यालयात शिक्षकाची नोकरी केली. संस्कृतही उत्तम शिकवित असल्याने विद्यार्थीप्रिय शिक्षक होते.
१९५२ मध्ये स्वर्गीय बाळासाहेब देशपांडेंनी जशपूरमध्ये वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. तेव्हापासून जगदेवजी आश्रमाच्या संपर्कात होते. १९७५ साली आणीबाणीत त्यांना ६ महिने तुरूंगवासही भोगावा लागला. संघात त्यांना देशभक्तीचे, समाजसेवेचे बाळकडू मिळाले होते. ते कल्याण आश्रमाचेही काम पाहत. उत्तरोत्तर आश्रमाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांची आश्रमाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा व्याप वाढला.  मोठमोठ्या पदावर पोहचूनही हजारो कार्यकर्त्यांशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यांच्यातल्या साधेपणामुळे ते प्रत्येकाला आपलेच वाटत. जगदेवजींवर विद्यार्थी, कार्यकर्ता, सामान्य माणूस असा प्रत्येकजण प्रेम करायचा.
हितरक्षा, खेलकूद, श्रध्दा जागरण जनजाती संपर्क अभियान आदी आयामांवर त्यांचे काम सुरू झाले. पूर्वांचलमध्ये ‘धर्म संस्कृती’ मंच्याच्या स्थापनेच्या माध्यमातून आश्रमाच्या कार्याचा खूप विस्तार त्यांनी केला. वनवासींच्या हितरक्षणासाठी त्यांना प्रसंगी संघर्षही करावा लागला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शबरी कुंभ, नाशिक सिंहस्थ कुंभमेळा, उज्जैन कुंभ असे मोठे कार्यक्रम आयोजित केले गेले. जनजातीतील उत्सवांना व्यापक स्वरूप देऊन त्यांनी सर्व जनजातींना एकत्र आणले.
त्यांना कामाचा प्रचंड अनुभव होता. तब्येतीच्या कुरबुरी चालू असूनही तिकडे दुर्लक्ष करून त्यांचा अखंड प्रवास चालू असे. निर्मळ मन, अमोघ वक्तृृत्व यामुळे ते जिथे जातील तिथल्या कार्यकर्त्यांना ते आपलेसे करीत. या सर्व प्रवासात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. परंतु ते डगमगले नाहीत. त्यांच्या कामाबद्दल त्यांना अनेक सन्मान प्राप्त झाले. पण त्यांना कधी अहंकार शिवला नाही. त्यांच्या मनात सतत जनजातींच्या उत्थानाचेच विचार असत. फक्त आपल्याच नाही तर सर्व जनजातींच्या विकासाचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांना मराठी भाषा समजत असे. त्यांनी जशपूरमध्ये गणेशोत्सव सुरू केला. त्यासाठी पुण्याहून अथर्वशीर्षाची २५० पुस्तके मागविली.

अशा हरहुन्नरी, समाजाप्रती जीवन समर्पित केलेल्या नेत्यासाठी एका कवीच्या ओळी उद्घृत कराव्याशा वाटतात. ‘जीवन त्यांना कळले हो। मी पण ज्यांचे पक्वफळापरी सहजपणाने गळले हो। जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळाले हो। चराचराचे होऊनी जीवन स्नेहासम पाजळले हो।’ अशा या राष्ट्रीय नेत्यास भावपूर्ण श्रध्दांजली!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading