fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

दिवाळी अंक हे वाड्मयीन इंद्रधनुष्य : डॉ. रामचंद्र देखणे 

पुणे :   दिवाळी अंक हा लेखक आणि वाचक यांच्यातील संवादाचा एक आनंद सोहळा आहे. एका पुस्तकातून एका लेखकाशी शब्दसंवाद घडतो पण एकाच दिवाळी अंकातून अनेक साहित्यिकांशी वाचकांचा संवाद होतो. दिवाळी अंक हे वाड्मयीन इंद्रधनुष्य आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ रामचंद्र देखणे  यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेतील  (२०२०) विजेत्यांना डॉ देखणे यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार,दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक वि. दा. पिंगळे उपस्थित होते.

या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ ‘रत्नाकर पारितोषिक’ ‘आंतरभारती’ या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाला, ‘मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक’ ‘चपराक’ या दिवाळी अंकाला, ‘शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक’ ‘महाराष्ट्र नामा’ या दिवाळी अंकाला, डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक ‘सायबर साक्षर’ या दिवाळी अंकाला  तर ‘जानकीबाई केळकर’ स्मृतिप्रीत्यर्थ ‘उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक’ ‘छावा’ या दिवाळी अंकाला तसेच दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे ‘दि. अ. सोनटक्के पारितोषिक’ ‘साहित्यदीप’ या दिवाळी अंकातील डॉ. भारती पांडे यांच्या ‘प्रेम सेवा शरण’ या कथेला आणि उत्कृष्ट ललित लेखासाठीचे ‘अनंत काणेकर पारितोषिक’ ‘साप्ताहिक सकाळ’ या दिवाळी अंकातील आदिती पटवर्धन यांच्या ‘विलक्षण ब्रम्हपुत्र’ या लेखाला  देण्यात आले. विविध विषयांना वाहिलेले दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित करणाऱ्या ‘छंद’ या दिवाळी अंकाचे संपादक दिनकर शिलेदार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

प्रा जोशी म्हणाले, “कोरोनाच्या विश्वव्यापी संकटातही जीव धोक्यात घालून आणि आर्थिक तोटा सहन करून ११२वर्षांची समृद्ध परंपरा खंडित होऊ नये म्हणून संपादकांनी दिवाळी अंक काढले ही महाराष्ट्रासाठी  अभिमानास्पद गोष्ट आहे . वाचकांनीही अंकाना उत्तम प्रतिसाद दिला. याची नोंद इतिहास घेईल. दिवाळी अंकांची संख्यात्मक वाढ होत असताना त्यांची वाङ्मयीन गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. अनेक दिवाळी अंकात तेच ते लेखक वर्षानुवर्षे लिहित असल्यामुळे अंकांना साचलेपण आले आहे. अशा अंकांनी नव्या लेखकांचा शोध घेतला पाहिजे. दिवाळी अंकांना जाहिरातीच्या रूपाने आर्थिक मदत करणे हे समाजातील धनिकांना पूर्वी  आपले सांस्कृतिक कर्तव्य वाटत होते. आज ती भावना राहिली नाही. वाचकांच्या अभिरुचीचा पोत बदलल्यामुळे त्यांना ललित साहित्याचा समावेश असलेल्या दिवाळी अंकांपेक्षा माहितीपर दिवाळी अंकांचे आकर्षण वाटते आहे.” सुनीताराजे पवार  यांनी आभार मानले. वि. दा. पिंगळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading