fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

मराठवाडा जनविकास संघा तर्फे भंडारा डोंगरावर संरक्षक जाळीसह 500 झाडांचे रोपण

पिंपरी :  पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने भंडारा डोंगरावर संरक्षक जाळीसह पाचशे झाडे लावण्यात आली. सध्याच्या कठीण परिस्थितीत वृक्षारोपण ही काळाची गरज निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात दोन हजार सहा फूट उंचीच्या रोपांचे वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी सांगितले.          

भंडारा डोंगरावर वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे संरक्षक जाळीसह लावण्यात आली. पुढील तीन वर्षे टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून वृक्ष संगोपन ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे. यावेळी बाळासाहेब काशीद, जोपाशेठ पवार, जगन्नाथ पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, वामन भरगंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर अट्टरगेकर, रोहित घोडके, सचिन रसाळ, रोहित जाधव, प्रमोद केंद्रे आदी उपस्थित होते.           

बाळासाहेब काशीद म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनीही ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे भंडारा डोंगर परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम आहे. वृक्ष भेदभाव करत नाहीत, त्याप्रमाणे सर्वांचे आचरण असले पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावत पर्यावरणाचे रक्षण करावे. वृक्ष आपले सखेसोबती आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपांची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.   

अरुण पवार यांनी सांगितले, की आपण प्रत्येकाने एक झाड लावले व जपले तर सर्वत्र वनराई झाल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने पर्यावरण सुदृढ राहण्यास मदत होईल. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने गेल्या दहा वर्षापासून प्रतिवर्षी किमान दोन हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही झाडे जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली जाते. जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading