fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई  :  राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यासारख्या संतांनी आपल्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले आहे. संतांची शिकवण आचरणात आणल्यास आपला महाराष्ट्र स्वच्छतेत आणि कोरोनामुक्तीत अव्वल राहील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केला. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०१७-१८ च्या राज्यस्तरीय स्पर्धेत विजेत्या ग्रामपंचायतींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आज हा सोहळा आयोजित करण्यात आला.

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत सन २०१७-१८ अंतर्गत अवनखेड, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ग्रामपंचायतीस प्रथम, लोणी बु. ता. राहता, जि. अहमदनगर या ग्रामपंचायतीस द्वितीय तर कुशेवाडा, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग या ग्रामपंचायतीस तृतीय क्रमांकाचा पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. नाशिक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अवनखेड ग्रामपंचायतीस पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोहळ्यास  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, सहसचिव अभय महाजन, जलजीवन मिशन अभियान संचालक हृषीकेश यशोद आदी मान्यवर वर्षा या शासकीय निवासस्थानाहून उपस्थित होते तर उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले, स्वच्छतेप्रमाणेच आता कोरोनामुक्त गाव स्पर्धा राज्य शासनाने सुरू केली आहे. गावे स्वच्छ झाली, तर कोरोनालाही आपल्याला हद्दपार करता येईल. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्याप्रमाणे सर्वांनी एकत्र येऊन दृढनिश्चय करून प्रयत्न केले त्याप्रमाणे जर सर्व नागरिकांनी जर माझे कुटुंब, माझे गाव, माझे राज्य कोरोनामुक्त करून दाखवेन असा दृढनिश्चय केला व त्याप्रमाणे कृती केली तर आपला महाराष्ट्र लवकरात लवकर कोरोनामुक्त झाल्याशिवाय राहणार नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading