fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRA

‘माणगाव परिषद – १९२०’ माहितीपटाचा सामाजिक न्याय दिनानिमित्त प्रिमियर

नवी दिल्ली : राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील परस्पर विश्वास अधोरेखीत करणारा प्रसंग म्हणजे माणगाव परिषद. या परिषदेच्या १०१ वर्षपूर्तीनिमित्त कोल्हापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने  ‘माणगाव परिषद १९२०’ हा माहितीपट तयार करण्यात आला  आहे. या माहितीपटाचा सामाजिक न्यायदिन या लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मदिनी (२६ जून) प्रिमियर होत आहे. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या माहितीपटाच्या प्रिमियरचे थेट प्रसारण होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीपटाची निर्मिती केली आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार,  इंद्रजित सावंत, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ.आलोक जत्राटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या माहितीपटाची संहिता, पटकथा तयार करण्यात आली आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी माहितीपटाच्या चित्रीकरणासाठी न्यू पॅलेसमध्ये तीन दिवस शूटिंगसाठी परवानगी दिली होती. पुणे येथील रिडीफाईन कॉन्सेप्ट्स संस्थेने हा माहितीपट बनवला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे १९२० साली ही परिषद झाली होती. “तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला, त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की, डॉ.आंबेडकर हे तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे तर अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील”, असे सार्थ उद्गार राजर्षी शाहू महाराजांनी २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथील अस्पृश्य समाजाच्या परिषदेत काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुकनायक वृत्तपत्रातील मजकूर आणि ज्येष्ठ संशोधकांच्या साहित्यातील संदर्भावरून या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading