fbpx
Thursday, April 25, 2024
Sports

नेमबाजीतील योगदानासाठी पवन सिंह यांचा आयएसएसएफ सुवर्ण पदकाने गौरव  

पुणे, दि. ३१ – नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन अर्थात आयएसएसएफच्या वर्ल्ड कप स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुण्याचे पवन सिंह यांना आयएसएसएफच्या वतीने सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले. नवी  दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात आयएसएसएफचे उपाध्यक्ष व भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) अध्यक्ष रनिंदर सिंह यांच्या हस्ते मानचिन्ह व मानपत्र प्रदान करीत पवन सिंह यांचा सत्कार करण्यात आला. आयएसएसएफ तांत्रिक प्रतिनिधी व कार्यकारी समिती सदस्य येर दविदोविच हे या वेळी उपस्थित होते.      

पवन सिंह हे सध्या भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव म्हणून कार्यरत असून दिल्ली येथे २०१९ मध्ये झालेल्या आयएसएसएफच्या वर्ल्ड कप स्पर्धेचे स्पर्धा व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. टोकियो जागतिक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पवन सिंह यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे. जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमधील आयएसएसएफच्या वर्ल्ड कप स्पर्धेकडे जगातील सर्वच नेमबाजांचे लक्ष लागून राहिले होते. या वेळी स्पर्धकांसाठी सुरक्षित आणि रोमांचकारी स्पर्धेचे आयोजन करण्यामध्ये पवन सिंह यांचा महत्त्वाचा वाटा होता. या स्पर्धेत ५३ देशातील तब्बल २९० स्पर्धक सहभागी झाले होते. यातील जागतिक स्पर्धा विभागाचे व्यवस्थापक म्हणून पवन सिंह यांनी काम पाहिले होते.

या आधी २०१६ साली आशिया ऑलिम्पिक निवड स्पर्धेच्या आयोजनासाठी सिंह यांना कांस्य पदक तर २०१७ साली आयएसएसएफच्या वर्ल्ड कप अंतिम फेरीच्या आयोजनासाठी रौप्य पदक देत गौरव करण्यात आला होता. आयएसएसएफकडून सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळविलेले ते पहिलेच भारतीय आहेत हे विशेष. याबरोबरच टोकियोमध्ये होणा-या ऑलिम्पिकसाठी ज्युरी मेंबर म्हणून निवड केले गेलेले ते पहिले भारतीय आहेत.

याविषयी बोलताना पवन सिंह म्हणाले, “आयएसएसएफकडून झालेल्या या कौतुकाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. या प्रवासात माझे सर्व सहकारी आणि एनआरएआई अध्यक्ष रनिंदर सिंह यांणी देखील मला खूप मदत केली. प्रत्येक पदकाबरोबर एक जबाबदारी येते, त्यामुळे ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी आणि नेमबाजी खेळाच्या उत्कर्षासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल. टोकियो येथे होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ज्युरी म्हणून सहभागी होणे हे माझे स्वप्न होते. ते पूर्ण करीत असताना मी पूर्णपणे झोकून देऊन कार्यरत राहील अशी ग्वाही यानिमित्ताने देऊ इच्छितो.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading