fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENT

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार – सावनी रविंद्रने पटकावला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार

सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका ‘सावनी रविंद्र’ हीला ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्कार जाहीर झाला आहे. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सावनीने याआधी मराठी, हिंदी, तमिळ, पंजाबी अशी विविध भाषेतील गाणी गायली आहेत.

आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका ‘सावनी रविंद्र’ राष्ट्रीय पुरस्काराविषयी सांगते, ”खरंच, मला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतील, आजपर्यंतच्या इतक्या वर्षांच्या प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचं फळ देवाने आज मला दिलं आहे, अशी भावना मनात आहे. माझ्या सर्व गुरूजनांचे आशीर्वाद, माझ्या आई-वडीलांचे कष्ट याचा यामध्ये खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मी आजवर माझ्या आयुष्यात यश संपादन करू शकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. आजवर मी ज्यापद्धतीने गाणी गायली त्याहीपेक्षा अजून जास्त मेहनत करून प्रेक्षकांना आवडतील अशी उत्तमोत्तम गाणी गाण्याचा मी कायम प्रयत्न करेन”.

‘बार्डो’ चित्रपटातील गाण्याविषयी सावनी सांगते, ‘बार्डो’ हा चित्रपट अजून प्रदर्शित झालेला नाही आहे. स्वप्नांवर आधारीत असलेल्या बार्डो या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘भीमराव मुडे’ यांनी केले आहे. या चित्रपटातील ‘रान पेटलं’ हे गाणं प्रचंड वेगळं आहे.या गाण्याला आघाडीचे प्रसिद्ध संगीतकार रोहन – रोहन यांचे संगीत लाभले आहे. या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणं रेकॉर्ड करताना संगीतकार रोहन-रोहन यांनी माझ्याकडून टोन चेंज करून ग्रामीण पद्धतीच्या आवाजात गाणं गाऊन घेतलं. मी आजवर रोमॅंटिक, इमोशनल अश्या पद्धतीची गाणी माझ्या नॅचरल आवाजात गायली आहेत. परंतु मी माझं ओरीजनल आवाजाचं टेक्शचर बदलून ग्रामीण पद्धतीत गायन करू शकते हा विश्वास त्यांनी मला दिला. आणि एक वेगळी कलाकृती निर्माण झाली. मला अजूनही तो क्षण आठवतो, जेव्हा संगीतकार रोहन-रोहन यांच्या घरच्या सेटपवर हे गाणं आम्ही रेकॉर्ड केलं होतं. अत्यंत भावूक करणारं हे गाणं आहे.”

पुढे सावनी म्हणते, ”आयुष्यात पहिल्यांदा मिळालेला पुरस्कार सर्वात स्पेशल असतो. मला आजपर्यंत विविध ठिकाणी नामांकन मिळाली. पण पुरस्कार कधी मिळाला नव्हता. मी गायलेल्या गाण्यासाठी, मला पुरस्कार मिळावा या प्रतिक्षेत मी होते. आणि तो क्षण आलाचं, मी गायन केलेल्या ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी मला पहिल्यांदाच ‘राष्ट्रीय पुरस्कार’ मिळाला. त्यामुळे हा पुरस्कार माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे. मी ईश्वराची, प्रेक्षकांची आणि माझ्या सर्व गुरूजनांची कायम ऋणी असेन.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading