fbpx
Thursday, April 25, 2024
NATIONALPUNETOP NEWS

पुनीत बालन यांचे इंद्राणी बालन फाउंडेशन आणि भारतीय लष्कर यांच्यात सामंजस्य करार

काश्मिरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी इंद्राणी बालन फाउंडेशनचा ‘नेशन फर्स्ट’ उपक्रम

पुणे, दि. 23 – युवा उद्योजक, चित्रपट निर्माते पुनीत बालन यांचे ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ राज्यात विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असते. इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या ‘नेशन फर्स्ट’ या उपक्रमांतर्गत आता काश्मिरी विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या वतीने काश्मीर खोर्‍यात भारतीय लष्कराच्या वतीने चालवण्यात येणार्‍या 5 गुडविल शाळांना मदत करण्यात येणार आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्स मुख्यालय येथे फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन आणि चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू यांनी नुकत्याच या संबधीच्या करारावर स्वाक्षाऱ्या केल्या. या प्रसंगी फाउंडेशनच्या उपाध्यक्षा जान्हवी आर. धारिवाल उपस्थित होत्या. या करारातंर्गत इंद्राणी बालन फाऊंडेशन उरी, वायन, तरेहगाम आणि हाजीनार या ठिकाणच्या गुडविल स्कूल्सला, तसेच बारामुल्ला येथे विशेष मुलांसाठी असलेल्या परिवार स्कूलला तांत्रिक, शैक्षणिक आणि आर्थिक मदत करणार आहे.

या प्रसंगी बोलताना चिनार कॉर्प्स मुख्यालयाचे प्रमुख कमांडर लेफ्टनंट जनरल बी. एस. राजू म्हणाले, काश्मीरसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. भारतीय लष्कराच्या वतीने जम्मू – काश्मीर मध्ये 44 गुडविल स्कूल्स चालवण्यात येतात, यातील 28 शाळा काश्मीर खोर्‍यात आहेत. या शाळांमधून एक लाखाहून अधिक स्थानिक विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. तर सध्या 10 हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. देशाच्या इतर भागातील विद्यार्थ्यांप्रमाणेच या मुलांना शिक्षण देण्याचा आमचा हेतू आहे. ‘इंद्राणी बालन फाउंडेशन’ शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवत असते, त्यांच्या अनुभवाचा उपयोग आम्हाला आणि काश्मिरी मुलांना निश्चित होईल. ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चा हा उपक्रम समृद्ध काश्मीरच्या उभारणीत मोलाचा हातभार लावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’चे अध्यक्ष व पुनीत बालन ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांनी सामाजिक दायित्वाची जबाबदारी म्हणून राष्ट्रउभारणीत केलेली ही गुंतवणूक कौतुकास्पद असल्याचे गौरोवोद्गार बी. एस. राजू यांनी काढले.

पुनीत बालन म्हणाले, “इंद्राणी बालन  फाऊंडेशन’चा, ‘नेशन फर्स्ट’ हा प्रभावी उपक्रम सुरू करतांना मला खूप आनंद होत आहे. गेले काही वर्षे आम्ही महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहोत. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. काश्मीर हा देशाचा अभिमानाचा परंतु संवेदनशील असा भाग आहे त्यामुळे तिथल्या काश्मिरी मुलांच्या  भविष्यासाठी आपलेही योगदान असावे असे आम्हाला वाटते. काश्मिरी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हा त्यांचा अधिकार आहे. 4 गुडविल स्कूल्स, विशेष मुलांसाठी असलेली परिवार स्कूल यांना तांत्रिक, शैक्षणिक व आर्थिक सहाय्य करण्याची संधी आम्हाला दिल्याबद्दल चिनार कॉर्प्स मुख्यालय आणि भारतीय लष्कराचे मी इंद्राणी बालन फाऊंडेशन तर्फे आभार मानतो. ” काश्मीर खोऱ्याच्या विकासासाठी केलेली ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजूनही काही प्रभावी उपक्रम आम्ही तिकडे राबविणार आहोत, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading