fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

चांगली पिढी घडविणे हे देखील महत्वाचे करिअर-राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे

पुणे : आजच्या धावपळीच्या काळात प्रत्येकजण गुणवत्ता मिळविण्याच्या आणि पैसा कमविण्याच्या मागे पळत आहे. परमेश्वराने स्त्रियांना नवी पिढी घडविण्याचे भाग्य दिले आहे. पालकांनी स्वत:चे करिअर घडविण्यामागे आपल्या घरातील मुलांकडे लक्ष देत, तो उत्तम नागरिक घडेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. चांगली पिढी घडविणे हे देखील महत्वाचे करिअर आहे, असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केले. 

श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर (पुणे) आणि मातृगौरव न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णानंद सरस्वती यांच्या पुण्यस्मरणदिनानिमित्त अकरा कर्तृत्ववान ज्येष्ठ मातांचा गौरव करण्यात आला. अखिल मंडई मंडळाच्या समाज मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, विनायक मोडक, आनंद सराफ, दत्ता सागरे, शिरीष मोहिते, शाहीर हेमंत मावळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे २३ वे वर्ष होते.

कार्यक्रमात शुभदा तौर, विलासिनी भिडे, लक्ष्मी कांबळे, रजनी कुलकर्णी, पुष्पा रासने, लक्ष्मी घाटे, कौसल्या इंगूळकर, शशिकला मेंगडे, रुक्मिणीबाई जाधव, सुजाता साठे, कुसूम कोकाटे, मेधा डोंगरे या मातांचा सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, तुळशीवृंदावन, फुलांची परडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. विनायक घाटे, हरिष मोरे, नृपेश गायकवाड यांचे उपक्रमाला सहकार्य लाभले.

ह.भ.प. चारुदत्त आफळे म्हणाले, परमेश्वराच्या अवकृपेने एखाद्या स्त्रिला मातृत्व मिळाले नसेल तर तिला समाजात हीन वागणूक दिली जाते. अनेक पालक मुल दत्तक घेतात. परंतु हे तुझे खरे आई वडिल नाहीत हे सांगून त्यांच्या आनंदात विघ्न आणले जाते. आपल्या विचारात बदल घडला तर पुढील पिढीमध्ये देखील चांगले बदल घडतील, असेही त्यांनी सांगितले. 

पुरस्काराला उत्तर देताना मेधा डोंगरे म्हणाल्या, व्यवसाय वृध्दी सुरू असताना कुटुंब किंवा व्यवसाय निवडण्याची परिस्थिती माझ्या समोर आली. तेव्हा कुटुंबाला माझी गरज आहे हे ओळखून मी कुटुंबाची जबादारी हाती घेतली. मुलांचा सांभाळ करीत असताना वेळप्रसंगी मला कठोर देखील व्हावे लागले, परंतु त्याचे फळ आज दिसत आहे. स्त्री म्हणून मी सहनशिलतेने काम केलेच, परंतु आज आई म्हणून मिळालेल्या सन्मानाने, कौतुकाच्या चार शब्दांनी मनाला उभारी मिळाली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. आनंद सराफ यांनी प्रास्ताविक केले. सारंग सराफ यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading