fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

सागरी अध्ययन केंद्राने भारताच्या ऐतिहासिक समुद्रीय वारशाचे पुनरुज्जीवन करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. 8 : भारताला मोठा सामुद्रिक वारसा लाभला आहे. देशाला ७५०० किमी लांबीचा तर महाराष्ट्राला ७२० किमी समुद्रकिनारा लाभला आहे. समुद्र केवळ देशाच्या सुरक्षेच्या  दृष्टीने महत्त्वाचा नाही; तर तो व्यापार, वाणिज्य, मत्स्य उत्पादन, तेल व भूगर्भ वायूनिर्मिती या दृष्टीने सर्वांकरिता महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने समुद्राच्या विविध पैलूंचा शास्त्रीय पद्धतीने सर्वंकष अभ्यास करावा तसेच समुद्र विज्ञानातील देशाच्या समृद्ध वारशाचेदेखील पुनरुज्जीवन करावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

मुंबई विद्यापीठाने नव्याने स्थापन केलेल्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स इन मेरीटाईम स्टडीज’चे उद्घाटन राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत झाले.

उद्घाटन सोहळ्याला भारतीय नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे संचालक डॉ. शेखर मांडे, कुलगुरू सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी तसेच केंद्राच्या प्रभारी संचालिका अनुराधा मुजूमदार उपस्थित होते.

राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, सागरी अध्ययन केंद्राने समुद्राचा एकात्मिक अभ्यास करताना समुद्रावर उपजीविका असणाऱ्या कोळी बांधवाच्या समस्यांचा देखील विचार करावा तसेच येऊ घातलेल्या वादळांची योग्य पूर्वसूचना देण्याच्या दृष्टीने हवामान विभागासोबत सहकार्य प्रस्थापित करावे. काही वर्षांनी मुंबई विद्यापीठ स्थापनेची १७५ वर्ष पूर्ण करील. तोपर्यंत  सागरी अध्ययन केंद्र जागतिक दर्जाचे केंद्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

जगातील ९० टक्के व्यापार जलवाहतुकीच्या माध्यमातून समुद्रातून होत असतो. मुंबई विद्यापीठाच्या सागरी अध्ययन केंद्रामुळे जनसामान्यांमध्ये समुद्राच्या व्यापक उपयुक्ततेबाबत जनजागृती होईल, असे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांनी सांगितले. सागरी अध्ययन केंद्राने समुद्राशी निगडीत विविध क्लिष्ट समस्यांचा अभ्यास करून देशाच्या विकास प्रक्रियेत योगदान द्यावे. या केंद्राला भारतीय नौदल पूर्ण सहकार्य करेल, असेही सिंग यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सखल सागरी मिशनसाठी चालू अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद केली असल्यामुळे मुंबई विद्यापीठाचे सागरी अध्ययन केंद्र योग्य वेळी स्थापन होत असल्याचे डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले. केंद्राला गोवा येथील नॅशनल सेंटर फॉर ओशनोग्राफी संपूर्ण सहकार्य करेल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading