fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRAPUNE

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल – अजित पवार

बारामती दि. 31 :- ‘मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती’ कार्यक्रम हा राज्यशासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असून पाच वर्षात एक लाख सूक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे उदिष्ट असल्याचे सांगतानाच, या योजनेसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून मोठया प्रमाणात उद्योजक तयार होतील. रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

बारामती विद्या प्रतिष्ठान येथील ग. दि. मा. सभागृहात मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमा अंतर्गत ‘माझा व्यवसाय, माझा हक्क’ या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी आ. अशोक पवार, आ. अतुल बेनके, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती प्रमोद काकडे, नगरसेवक किरण गुजर, समन्वयक कौस्तुभ बुटाला, सचिन पवार, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर, ससुनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, एच.डी.एफ.सी. बॅकेच्या श्रृती नंदुरबार, ॲक्सीस बॅकेचे योगेश हरणे, बंधन बँकेचे सत्यजीत मोहिते, रत्नाकर बँकेचे मिलिंद विचारे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच वर्षात एक लाख सुक्ष्म व लघूउद्योग प्रस्थापित करण्याचे राज्य शासनाचे उदिष्ट आहे. हे उदिष्ट प्राप्त केले तर मोठया प्रमाणात युवक, युवतींना रोजगार मिळणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, महिला , अपंग, माजी सैनिक यांना योजनेत सवलत देण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय आढावा व समन्वयन समिती स्थापन करण्यात आली असून उत्पादन, सेवा उद्योग, कृषी पूरक व्यवसाय, कृषीवर आधारित उद्योग, ई-वाहतूक व व्यवसाय , फिरते विक्री केंद्र या व्यवसायांमध्ये युवकांना व युवतींना संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रम हा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यातील युवक युवतींना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी त्यांचे स्वयंरोजगार प्रकल्प उभे राहण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुद करण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व्यवसाय सुर करु इच्छिणा-या युवक युवतींनी पुढे यावे. योजनेचे निकष पूर्ण करणा-या गरजूंना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील युवक, युवतींनी या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनायोध्यांचा गौरव करुन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मानवतेच्या रक्षणासाठी कोरोना कालावधीत तुम्ही केलेले काम कायम स्मरणात राहील. राज्यात कोरोनाचे प्रमाण कमी होत आहे, याचे सर्व श्रेय कोरोना योध्यांना जाते. कोरोना कालावधीत डॉक्टर तसेच वैद्यकीय सेवा देणारे व सर्वच घटकांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. कोरोनाचे संकट अजुनही टळलेले नाही. त्यामुळे प्रत्येकाने दक्षता नियंमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविक ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी केले. यावेळी समन्वयक कौस्तुभ बुटाला, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी पी. डी. रेंदाळकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
बारामती शहर व तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमानंतर अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी बारामती , शिरुर व जुन्नर तालुक्यासाठी एकूण चार मोबाईल क्लिनिकचे ( फिरता दवाखाना ) लोकार्पण करण्यात आले. या फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून रक्तदाब , मधुमेह, कान, डोळे तपासणी, ईसीजी सारख्या विविध 50 तपासण्या विनामूल्य होणार आहेत . याशिवाय आशासेविकांना मास्कवाटप, कोविड योद्ध्यांचा गौरव व कोविड यंत्रसामग्री प्रदान करण्याचाही कार्यक्रम झाला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading