fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

लोकल रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार

मुंबई, दि. २९ – कोविड परिस्थितीमुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वांना यातून प्रवास करता येईल तसेच त्यांची होणारी गैरसोयही टळेल. याशिवाय मुंबई व उपनगरातील विविध कार्यालये व आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वाना सुविधा होईल, असेही यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  म्हटले आहे.

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत  मुंबईतील लोकल  रेल्वे सेवा सर्वांसाठी सुरु करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती.  यात वरिष्ठ रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते. सर्व प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्यासाठी गर्दी होणार नाही व आरोग्याचे नियम पाळले जातील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते, त्याचप्रमाणे आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी खालीलप्रमाणे ही सेवा उपलब्ध असणार आहे. सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल. म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

उपहारगृहे व दुकानांसाठी वेळा

मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील दुकाने व आस्थापना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील तसेच उपहारगृहे रात्री १ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येतील. दुकानांसाठी कमाल कर्मचाऱ्यांची ३० टक्के उपस्थितीची अट तसेच उपहारगृहे, फूड कोर्ट यासाठी वेळोवेळी निर्गमित एसओपीप्रमाणे अंमलबजावणी राहील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading