fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

अपप्रचाराला बळी न पडता, शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची गरज ; युवक क्रांती दलाच्या जाहीर सभेतील सूर

पुणे, दि. २७ – ‘ सरकार समर्थक अपप्रचाराला बळी न पडता, सर्व शक्ती लावून शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे’, असा सूर युवक क्रांती दलाच्या जाहीर सभेत उमटला.

‘शेतकरी आंदोलन आणि पुणेकरांची भुमिका ‘ या विषयावर ही सभा २७ जानेवारी रोजी सायंकाळी एस.एम. जोशी सोशालिस्ट फाऊंडेशन येथे झाली.

अध्यक्षस्थानी युवक क्रांती दलाचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र धनक होते.आर्थिक, राजकीय विषयांचे अभ्यासक सी.ए. प्रसाद झावरे, शेती अभ्यासक डॉ. दीपक गायकवाड, युवक क्रांती दलाचे राज्य सहकार्यवाह अप्पा अनारसे या सभेत सहभागी झाले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात सहभागी झालेले अप्पा अनारसे म्हणाले, ‘ भांडवलशाही व्यवस्थेने शेतमालाला दर मिळू दिलेला नाही. कोणाचीही मागणी नसताना शेती विषयक ३ कायदे करण्यात आले. त्यावर चर्चा होऊ दिली गेली नाही. दिल्लीत दहा मार्गावर शांततेने ट्रॅक्टर परेड झाली, पण, त्याची चर्चा होऊ दिली गेली नाही. गोबेल्स नीतीने सतत खोटं बोलून मूळ प्रश्नाला बगल दिली जात आहे. सरकारच्या मनात लोकशाही नसल्याने आंदोलने नीट हाताळली जात नाहीत. आंदोंलनाच्या विरोधात षडयंत्र रचले गेले. देश चालवायचा आहे की रिलायन्सचे कार्यालय चालवायचे आहे ?

प्रसाद झावरे म्हणाले, ‘ दिल्लीतील सध्याचे सरकार निगरगट्ट आहे. सोशल मीडियाद्वारे सरकार समर्थक दुसरा विचार मांडू देत नाहीत. नोटबंदी पासून सर्व गोष्टी एककल्लीपणे निर्णय लादले जात आहेत. घिसाडघाईने जीएसटी, एनआरसी कायदा लादला गेला. शेती विषयक कायदे वाईट असण्यापेक्षा त्यामागचा हेतू वाईट आहे. सरकार सगळया सरकारी कंपन्या,गोष्टी विकत आहे, ते कोण विकत घेत आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.

मोठया मोबाईल कंपन्या खुल्या बाजारात टिकल्या नाहीत, तर पुढे खुल्या बाजारात शेतकरीच काय, पण, आडते -दलाल कोणीच टिकणार नाही. सरकार समर्थक कंपनीच टिकेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने अर्थव्यवस्था डबघाईला येत नाही. कंपन्यांसाठी निर्लेखित केलेल्या कर्जाची रक्कम त्याहून मोठी आहे. इनसॉल्वन्सी घेतलेल्या उद्योगांना त्याच मालमत्तेवर नवे कर्ज घेता येते. पण, शेतकऱ्याचा सात -बारा कधीच कोरा होत नाही.

डॉ.दीपक गायकवाड म्हणाले, ‘ शेतकरी हा जगातील सर्वात आदर्श व्यवस्थापक आहे. पण, त्याचे कोणी कौतुक करीत नाही.शेतकऱ्यांच्या संवेदनेसाठी मध्यमवर्गाने कार्यरत राहण्याची गरज आहे. हवा कुठे चालली आहे, हे शेतकऱ्याला आधी कळते. शेतीत दोन टक्क्याहून अधिक नफा नसतो, तो पाच वर्षातून एकदाच होतो. देशी इंग्रजांना स्वस्तात कच्चा माल हवा आहे. पण, नाव ग्राहकाचे पुढे केले जात आहेत. शेतकरी हे काय ग्राहक नाहीत का ? उद्योग आणि मध्यमवर्गाचे ओझे शेतकरी, कामगार, मजूराच्या खांद्यावर आहे. अर्थकारणाचा पाया असलेल्या शेतीकडे,कृषी अर्थशास्त्राकडे दुर्लक्ष झाल्यास निर्माण होणाऱ्या असंतोषाचा कधीही स्फोट होऊ शकतो.

अध्यक्षस्थानावरून बोलताना रवींद्र धनक म्हणाले, ‘ शेतकरी प्रत्येक पंचवार्षिक मध्ये पाच वर्ष तोटयात असतो. तो कायम एनपीए मध्ये जगतो.आरक्षणापासून, बेरोजगारीपर्यंत सर्व प्रश्न शेतीच्या ओढाताणीतून निर्माण झाले पाहिजे. मध्यमवर्गापासून सर्वांचे शोषण हे बांडगुळासारखी आर्थिक व्यवस्था शोषून घेते. मध्यमवर्गाने जागे होण्याची गरज आहे. उद्याच्या क्रांतीचे नेतृत्व मध्यमवर्गाला करायचे आहे. ‘

शेतकरी आंदोलनात १८ दिवस पुण्यात ठिय्या देणारे कार्यकर्ते अस्लम बागवान, तसेच आयेशा यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading