fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRASportsTOP NEWS

क्रीडा विद्यापीठ जागतिक दर्जाचे असेल – क्रीडामंत्री सुनील केदार

पुणे, दि. 25 –  क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक उंचावणारे अनेक खेळाडू आणि संघटक पुण्यात आहेत. त्यांचा फायदा घेत शिवछत्रपती क्रीडानगरीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे जगातील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठ असेल असा विश्वास  महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण खात्याचे मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला.  म्हाळुंगे बालेवाडी येथे लवकरच क्रीडा विद्यापीठ सुरू होणार आहे त्यानिमित्त येथे ज्येष्ठ क्रीडापटू, प्रशिक्षक संघटक आणि क्रीडाविषयी अभ्यासकांची बैठक ऑरकीड हॉटेल, शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी  येथे आयोजित करण्यात आली होती.  त्या प्रसंगी केदार बोलत होते 

या बैठकीस श्रीरंग इनामदार, प्रकाश तुळपुळे, ऑलिंपिक कुस्तीवीर मारूती आडकर, काका पवार, शांताराम जाधव, बाळासाहेब लांडगे, रणजित चामले, व्यंकटेश वांगवाड, सुंदर अय्यर, नयना निमकर, शकुंतला खटावकर, रेखा भिडे मुंडफन, स्मिता शिरोळे-यादव, मनोज पिंगळे, डॉक्टर विपुल लुनावत, पवन सिंग, अभिजीत कुंटे शिल्पा भोसले आदी ज्येष्ठ खेळाडू आणि संघटक उपस्थित होते. नामदार श्री. केदार यांनी आगामी विद्यापीठा बाबत त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी केलेल्या सूचनांचा ही सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले.

सुनील केदार म्हणाले आगामी क्रीडा क्षेत्राकडे प्राधान्यक्रमाने आम्ही महत्त्व देत आहोत. येथील विद्यापीठातून अनेक आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडतील. ज्या खेळाडूंना पदक मिळवता येणार नाही अशा खेळाडूंनाही सांगली नोकरी आणि रोजगाराची संधी मिळेल असाच आमचा दृष्टिकोन असणार आहे. क्रीडा विद्यापीठ हे केवळ राज्य शासनाचे नसून त्याकडे क्रीडा क्षेत्रातील संबंधित असणाऱ्या सर्व लोकांनी सांघिक जबाबदारी म्हणूनच पाहिले पाहिजे तरच हे विद्यापीठ स्थापन करण्यामागचा उद्देश सफल होईल आणि मला अशी खात्री आहे की राज्यातील आणि परराज्यातील क्रीडा संघटनांचे आम्हाला चांगले सहकार्य मिळेल.

राज्याचे क्रीडा व युवक सेवा आयुक्त  ओम प्रकाश बकोरिया  यांनी प्रस्ताविक करताना सांगितले, सन २०१२ मध्ये तयार केलेल्या क्रीडा धोरणानुसारच क्रीडा विद्यापीठाची संकल्पना पुढे आली आणि आता त्याला मूर्त स्वरूप आले आहे. अतिशय चांगल्या वातावरणात हे विद्यापीठ स्थापन होत आहे. तेथे क्रीडाविषयक वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा समावेश असेल आणि तेथे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकही उच्च दर्जाचे असतील. त्यादृष्टीने प्रदेशांमधील सर्वोत्तम क्रीडा विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाणार आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाच्या नियमावलीनुसार या विद्यापीठाचे कामकाज चालेल.

शिक्षण तज्ञ डॉक्टर जवाहर सुरिशेट्टी यांनी सांगितले, येथील विद्यापीठात अद्यावत क्रीडा मानस शास्त्रज्ञ, क्रीडा वैद्यकीय तज्ञ उपलब्ध केले जाणार आहेत. त्यामुळे खेळाडूंना वैद्यकीय उपचाराकरता परदेशात जाण्याची आवश्यकता भासणार नाही. पुण्याजवळच अनेक पर्यटन स्थळे आहेत, येथील विविध क्रीडा स्पर्धा निमित्त येणाऱ्या खेळाडू आणि चाहत्यांना फावल्या वेळेत पर्यटनाचा आनंद घेता येईल. त्यामुळे येथील पर्यटन व्यवसायातही चालना मिळेल. तसेच क्रीडा क्षेत्रातील नवनवीन संकल्पना आणि संशोधनासाठी येथे चालना दिली जाईल. याच बैठकीमध्ये डॉक्टर डी.एस. भामरे,अमरावतीचे डॉक्टर अरविंद देशपांडे यांनीही आपले विचार मांडले. क्रीडा सहसंचालक सुहास पाटील यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading