fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRATOP NEWS

पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी सदैव कटिबद्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २६ : सण, उत्सव असो वा सभा असो जमलेल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आमचे पोलीस चोवीस तास कर्तव्य बजावत असतात. स्वत:च्या कुटुंबातील, घरातील सुख दु:ख बाजूला ठेवून जनतेच्या सुख दु:खात सामिल होणाऱ्या आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे. पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन सदैव कटिबद्ध असून त्यांच्यासाठी जे-जे करणे शक्य आहे ते सर्व करणारच आणि हे वचन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र पोलीस महासंचालनालयात आयोजित हुतात्मा दालन उद्‌घाटन व कॉफी टेबल बुक प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, शौर्याला वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलो आहोत. २६ नोव्हेंबर हा शौर्यदिन. या दिनी शहीद झालेल्या सर्व शूरवीरांना वंदन व नतमस्तक. हा दिवस आपण विसरू शकत नाही. त्या दिवशी मी मुंबई बाहेर होतो. मुंबईतील घटना कळताच प्रथम विजय साळसकरांना फोन लावला. घटनेची माहिती देताना साळसकरांनी सांगितले की, मी आता घरी असून लगेचच घटनास्थळी जात आहे. काही वेळानी मी त्यांना फोन लावला, पण तो फोन उचलला गेलाच नाही आणि ती दुर्दैवी घटना घडली. बारा वर्ष झाली, यापुढेही कित्येक वर्ष उलटतील, पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही.

अगदी नक्षलवादी अतिरेक्यांपासून ते भुरट्या चोरांपासून सर्वांना पकडणारा हा आमचा पोलीस एक महत्त्वाचा घटक आहे. तो सुदृढ राहिलाच पाहिजे, त्याला सुदृढ ठेवणे हे आमचे कर्तव्य आहे. यापुढे अतिरेकी महाराष्ट्र, मुंबईवर हल्ला काय पण मुंबईचे नाव पण घेऊ शकणार नाहीत, त्यांना धडकी भरेल असे आपण पोलीस दलाचे भक्कम सक्षमीकरण करू.

पोलिसांची कामे ही जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्याकरिता अशा हुतात्मा दालनाची संकल्पना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सर्वत्र राबविण्यात यावी. देश-विदेशातही पोलीस व लष्करी प्रशिक्षणाची व्यवस्था शालेय जीवनापासून आहे, असे सांगताना त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. पोलिसांवरील हल्ला ही अत्यंत चुकीची बाब असून त्यांच्या कर्तव्याचा आपण आदर केला पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

‘अतुल्य हिंमत’ हे युक्ती आणि प्रसंगी शक्तीचा वापर करुन पोलिसांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीचा सचित्र दस्तावेज आहे. हे पुस्तक अप्रतिम झाले असून मी त्याकडे मुख्यमंत्री, नागरिक आणि कलावंत अशा तिहेरी भुमिकेतून पाहत आहे. अतिशय सुबक मांडणी व सुयोग्य सादरीकरण या कॉफिटेबल बुकमध्ये आहे. अशा प्रकारच्या अप्रतिम कॉफिटेबल बुकच्या निर्मितीबद्दल मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांचे अभिनंदन केले.

या हुतात्मा दालनाचे उद्‌घाटन शहीद पोलीस बांधवांच्या वीर पत्नी व कुटुंबियांकडून होत आहे, ही आनंदाची बाब आहे, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, देशाचा कणा असलेल्या मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी जो हल्ला झाला तो मोठ्या हिंमतीने आपल्या पोलीस व जवानांनी परतवून लावला. ९ अतिरेकी मारले व एका अतिरेक्याविरुद्ध न्यायालयाद्वारे लढा लढवून त्यास फासावर लटकवले. नक्कीच आपल्या पोलिसांचे यात शौर्य आहे.

आपल्या प्रास्ताविकातून पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांनी हुतात्मा दालन व अतुल्य हिंमत या कॉफीटेबल बुक संदर्भात माहिती दिली. १९६४ ते २०१९ या कालावधीत विविध घटनांमध्ये शहीद झालेल्या ७९७ हुतात्म्यांची एकत्रित माहिती या दालनात उपलब्ध आहे. तसेच विविध फिल्म्सद्वारेही पोलिसांच्या शौर्याची माहिती दालनातून दिली जाते. माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सुरू केलेल्या हुतात्मा दालन निर्मितीची परिपूर्ती आज झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या हे दालन रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याचे नियोजन असून भविष्यात ते सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करुन दिले जाईल. त्यामुळे पोलीस व जनता यांच्यातील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या सुरुवातील शहीदांचे कुटुंबिय विनीता अशोक कामटे,  स्मिता विजय साळसकर तारा ओंबळे,  मानसी शिंदे तसेच जिजाबाई आलम यांच्या हस्ते हुतात्मा दालनाचे औपचारीक उद्‌घाटन करण्यात आले. तद्‌नंतर सामाजिक अंतर राखून आयोजित केलेल्या हॉलमधील या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांच्या संदर्भातील एक लघुपट दाखविण्यात आला.

यावेळी आमदार भाई जगताप, मुख्य सचिव संजय कुमार, अपर मुख्य सचिव (गृह) सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पोलीस आयुक्त परमवीर सिंग  तसेच सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. सुहास वारके यांनी केले तर आभार प्रदर्शन अपर पोलीस महासंचालक सिंघल यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading