fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

अमृतमहोत्सवी समारंभातील मदत कलशाद्वारे पुरंदर तालुक्यात २५ दिवाळी फराळ साहित्य किट

पुणे : सार्वजनिक आणि वैयक्तिक समारंभांना पुष्पगुच्छ, महागडया भेटवस्तू आयोजकांना पाहुण्यांकडून दिल्या जातात. अनेकदा त्या पुष्पगुच्छ किंवा वस्तूंची गरज त्या कार्यक्रम करणा-यांना देखील नसते. आपल्या कार्यक्रमात येणा-या पाहुण्यांनी पुष्पगुच्छ किंवा कोणत्याही वस्तूंवर खर्च न करता ती रक्कम गरजूंची दिवाळी आनंददायी करण्याकरीता उपयोगी पडावी, याकरीता पुण्यातील नलिनीदेवी प्रतापसिंह कदम जहागिरदार यांच्या अमृतमहोत्सवी समारंभात मदत कलश ठेवण्यात आला. त्याद्वारे जमा झालेल्या रकमेतून पुरंदर तालुक्यातील २५ गरजू कुटुंबाना दिवाळी फराळ साहित्य किट देण्यात आले आहेत. 
प्रताप प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे या उपक्रमाचे संकल्पक यशोधन कदम जहागिरदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार यांनी त्यांच्या मातोश्री नलिनीदेवी प्रतापसिंह कदम जहागिरदार यांच्या कृतार्थ जीवनाची ७५ वर्ष हा पंचाहत्तरीचा कार्यक्रम केला. जमलेल्या निधीतून उत्तम प्रतीची साखर – ५ किलो, भाजके पोहे – अर्धा किलो, बेसन –  २ किलो, तूप- १ किलो, तेल- ३ किलो, शेंगदाणे -१ किलो, रवा – २ किलो, मैदा – १ किलो, चकली भाजणी – १ किलो तसेच सुगंधी तेल १ बाटली, उटणे २ पाकीट, २ साबण  अशा प्रकारे २५ किट तयार झाले. किट तयार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिरीष मोहिते यांनी बहुमोल सहकार्य केले. 
यशोधन कदम जहागिरदार म्हणाले, पंचाहत्तरीसाठी येताना कुणीही भेटवस्तू, साडी, पुष्पगुच्छ न आणता कार्यक्रमस्थळी ठेवलेल्या मदत कलशात ऐच्छिक आर्थिक मदत अर्पण करण्याचे आवाहन केले होते. हेतू हाच की देवदयेने आपल्याला सर्व काही मिळाले आहे. परंतु ज्यांचे जीवनात काबाडकष्टच लिहिले आहेत, त्यांना या आर्थिक मदतीतून दिवाळी फराळ साहित्य किट तयार करून वाटप करायचा आमचा मानस होता. 
जमा झालेल्या रकमेतून पुरंदर तालुक्यांतील दुर्गम अशा काळदरी या गावात त्याचे वाटप करण्यात आले. किट वाटपासाठी स्नेहांकूर या संस्थेच्या अ‍ॅड. वृषाली दातार व अभिजीत दातार यांनी मदत केली. या उपक्रमाबाबत ऋणनिर्देश करणारे काळदरी येथील श्री गुरूदत्त व्यायाम क्रीडा मंडळाचे पत्र आम्हाला उपक्रमानंतर मिळाले. आपल्यासोबत या ग्रामस्थांची दिवाळी पण गोड करता आली ही भावना सर्वांना भावली असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading