fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

विविध ठिकाणच्या सामाजिक कार्यातून पुण्याचा एकत्रित विकास-  शोभा धारिवाल यांचे मत

पुणे : दिवाळीच्या अगोदर भाऊबीज द्यायची ही संकल्पना आगळीवेगळी आहे. अनेक सामाजिक संस्था पुण्याच्या विविध भागांत कार्यरत आहेत. शहराच्या विविध भागात संस्थांकडून अशाच प्रकारचे सामाजिक कार्य सातत्याने सुरु राहिले, तर संपूर्ण पुण्याचा एकत्रित विकास होईल, असे मत आर.एम.धारिवाल फाऊंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल यांनी व्यक्त केले.


प्रभात जन प्रतिष्ठान, गुरुवार पेठ तर्फे शहराच्या पूर्व भागातील महिलांसोबत आपुलकीची भाऊबीज हा कार्यक्रम महात्मा फुले पेठेतील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे झाला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, इस्कॉन पुणेचे उपाध्यक्ष प्रभू श्वेत दीपदास उर्फ संजय भोसले, नगरसेवक अजय खेडेकर, नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उदय वाडेकर, रवींद्र भन्साळी, मनोज शेलार, केतन भागवत, मंगेश शिंदे, ओंकार नाईक आदी उपस्थित होते. महिलांनी कार्यकर्त्यांना औक्षण केल्यानंतर त्यांना दिवाळी किट देण्यात आले. 
संजय भोसले म्हणाले, भारत हा सुसंस्कृत देश आहे. ज्या देशातील माणसे अध्यात्मिक क्षेत्रात रममाण असायचे, तो भारत देश. जीवन जगण्याची कला शिकविणारे उत्कृष्ट ग्रंथ आणि त्यांचा अभ्यास करणारे संत, ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे या महान देशात जन्म घ्यायला नशिब लागेल, असेच म्हणावे लागेल. जगण्याची भावना इतर देशांनी भारताकडून शिकायला हवी. भारतात सुविधांची मांदियाळी नसेल पण सुखांचा सुकाळ आहे.  
किशोर चव्हाण म्हणाले, दिवाळीचा दिवा प्रत्येक घरात प्रकाशित झाला पाहिजे, या उद्देशाने शहराच्या पूर्व भागातील गरजू महिलांसाठी आगळा-वेगळी भाऊबीज  प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात येते. पूर्व भागातील महिलांना दिवाळीपूर्वीच दिवाळीचे साहित्य व धान्य देण्यात येते. यावर्षी १५० महिलांना २४ प्रकारचे साहित्य असलेले किट देण्यात आले. सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून प्रतिष्ठान हा उपक्रम राबवून त्या महिलांच्या घरातील दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी करत आहे, असेही त्यांनी सांगितले. निलेश कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. मंगेश शिंदे यांनी आभार मानले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading