fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी ऊर्जामंत्री ‘ग्राऊंड झिरो’वर

मुंबई, दि.1: टाटा वीज निर्मिती केंद्राने आयलँडिंगच्या काळात मुंबईला वीज पुरवठा न केल्याच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत हे सोमवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या ट्रॉम्बे येथील टाटा औष्णिक वीज निर्मिती केंद्राला भेट देऊन पाहणी  करणार आहेत.

सकाळी अकरा वाजताच्या सुमारास डॉ.राऊत टाटा वीज निर्णय केंद्रात येणार असून त्यानंतर आयलँडिंग यंत्रणेचे अद्यावतीकरण, भविष्यातील वाढीव वीज निर्मितीसाठी कंपनीचे नियोजन, स्काडा आणि नविनीकरण ऊर्जा यावर टाटा कंपनीतर्फे त्यांच्यासमोर सादरीकरण होईल. या ऊर्जा प्रकल्पाची ते प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर या वीज निर्मिती केंद्रात दुपारी 2 वाजता ते पत्रकार परिषदेला संबोधित करतील.

टाटा वीज कंपनीच्या अंतर्गत असलेली मुंबईची आयलँडिंग यंत्रणा 12 ऑक्टोबरला मुंबईला बाहेरून येणारा वीजपुरवठा बाधित झाल्यावर कार्यान्वित होणे गरजेचे होते. मात्र ती कार्यान्वित न झाल्याने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काही तास वीज खंडित होऊन मोठा फटका बसला. याची गंभीर दखल ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी घेतली आणि त्यादृष्टीने भविष्यातील धोका टाळण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांना (ग्राऊंड झिरो) भेट देत आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी त्यांनी राज्य भार प्रेषण केंद्र आणि खारघर येथील महापारेषणचे केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन वीज ठप्प होण्यामागील कारणे समजून घेतली.

सोमवारी डॉ.राऊत हे टाटा वीज कंपनीच्या टाटा थर्मल पॉवर प्लांटला प्रत्यक्ष भेट देणार आहेत. वीज पुरवठा ठप्प झाल्याबद्दल डॉ. नितीन राऊत हे संबंधित यंत्रणांचा वेळोवेळी आढावा घेत असून दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. राज्याला अखंडीत वीज पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका वठविणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्र, ऐरोली (एसएलडीसी) येथेही उर्जामंत्र्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन या केंद्राच्या कामकाजाची पाहणी केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading