fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

कोरोनाने बंधुता, माणुसकीचे महत्व अधोरेखित – हरिश्चंद्र गडसिंग

पुणे : “कोरोनाच्या महासाथीच्या काळात बंधुता, माणुसकी हेच सर्वात महत्वाचे असल्याचे अधोरेखित झाले आहे. अनेकांनी बंधुतेच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करत गरजूना आधार दिला. त्यामुळे आपण बंधुतेचा विचार सतत तेवत ठेवला पाहिजे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ हरिश्चंद्र गडसिंग यांनी केले. बंधुता साहित्य संमेलनातून हा विचार पेरण्याचे काम होताना पाहून आनंद होतो, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने पिंपळेगुरव येथील बंधुता भवनमध्ये बांधलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन, नियोजित २२ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत वानखेडे, सातव्या विद्यार्थी-शिक्षक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य प्रदीप कदम यांचा सत्कार सोहळ्यात गडसिंग बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे होते. प्रसंगी भगवान महावी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक. डॉ. अशोककुमार पगारिया, डॉ. विजय ताम्हाणे, प्रकाश जवळकर, मधुश्री ओव्हाळ, चंद्रकांत धस, संगीता झिंजुरके, शंकर आथरे, प्रशांत रोकडे आदी उपस्थित होते.

प्रकाश रोकडे म्हणाले, “कृषी, औद्योगिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रासह सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रालाही मोठा फटका बसला. त्यातून आता हळूहळू सगळेजण सावरत आहेत. सांस्कृतिक क्षेत्राला पुनर्भरारी घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी गतिमान होण्याची गरज आहे. आपण जन्मलो १९ व्या शतकात आणि कर्तृत्व गाजवले ते २० व्या शतकात त्यामुळे दोन्ही शतकाचे आपण साक्षीदार आहोत. दोन्ही शतकांमध्ये सर्वच क्षेत्रांनी उत्तुंग प्रगती पाहिल्यानंतर गेले काही महिने वाईट काळही पाहिला. परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येत असल्याचे चित्र दिसून येते आहे.”

प्रा. अशोककुमार पगारिया यांनी आपले विचार मांडताना बंधुता परिवाराच्या कार्याचा गौरव केला. प्रा. वानखेडे, प्राचार्य कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. विजय ताम्हाणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. शंकर आथऱे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading