fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर द्या – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पीक परिस्थिती व कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

पुणे दि.7: शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी कृषी विभागाच्या योजना महत्त्वपूर्ण आहेत. शेतक-यांसाठी असलेल्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहचला पाहिजे. शेतीपूरक उद्योगांच्या वाढीसाठीही प्रयत्नांची गरज आहे. रेशीम शेती, शेततळयांमध्ये मत्स्यपालन, यांत्रिकीकरणावर भर देण्यासोबतच शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज केले.
जिल्ह्यातील खरीप, रब्बी परिस्थिती व कृषी योजनांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, कृषी उपसंचालक विजय कानडे, तंत्र अधिकारी प्रमोद सावंत,नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे, महाबीजचे क्षेत्र विकास अधिकारी मृणाल बांदल, रेशीम विकास अधिकारी संजय फुले आदींसह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, आत्माचे सदस्य आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की, शेती व शेतक-यांसाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच बाजारपेठ असलेल्या पिकांचे उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त करणे व शेतकरी ते ग्राहक अशी साखळी तयार करण्यावर भर देत अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यात यावी. शेतीपूरक उद्योगांनाही प्राधान्य देण्यात यावे. रेशीम शेतीक्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात यावा. शेततळयात मत्स्यपालन, कृषी यांत्रिकीकरण वाढीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगतानाच शेती क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासोबतच शेतक-यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणारअसल्याचे त्यांनी सांगितले.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेच्या परिपूर्ण अंमलबजावणीसाठी कृषी विभागाने पोलिसांकडून वेळोवेळी माहिती घेऊन संबंधित कुटुंबाना लाभ मिळवून दिला पाहिजे. पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहू नयेत, याबाबत दक्षता घ्या, असे निर्देश देत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना, दुष्काळ मुल्याकंनासाठी रब्बी तालुके वर्गीकरण, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषि यांत्रिकीकरण अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम , गट शेती योजना, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृद आरोग्य पत्रिका कार्यक्रम, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना अंतर्गत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना आदी योजनांचा आढावा घेतला. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोठे यांनी सादरीकरणाव्दारे माहिती दिली.
आत्माच्या कामकाजाचाही घेतला आढावा
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान प्रकल्प (आत्मा) च्या कामाचाही आढावा घेतला. आत्माच्य माध्यमातून सुरू असलेल्या शेतीशाळा,कौशल्य आधारित कामे, परंपरागत कृषी विकास योजना,शेतकरी मित्र, तसेच ब्रॅडींग याबाबत आत्माचे प्रकल्प संचालक साबळे यांनी माहिती दिली. यावेळी कृषी तसेच सबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading