fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

महावीर जोंधळे लिखित महात्मा गांधींवरील मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन

पुणे – ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे यांनी महात्मा गांधींवर लिहिलेल्या “जमीन अजून बरड नाही” या मराठीतील पहिल्या दीर्घ कवितेचे प्रकाशन गांधी जयंतीचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी बोलताना उल्हासदादा पवार म्हणाले, जमीन अजून बरड नाही हे कवितेचे शीर्षक गांधी विचारांची मौलिकता सिद्ध करते. गांधी विचार रुजण्यासाठी अजूनही इथली भूमी सुपीक आहे असा आशावाद या कवितेतून मांडला आहे. सभोवतालच्या वाढत्या हिंसक वातावरणात नव्या पिढीसाठी तर हा संदेश अत्यंत प्रेरणादायी आहे. महावीर जोंधळे यांनी या कवितेतून भारतातल्या सांस्कृतिक राजकारणाचा पट उलगडून दाखवला आहे. इतका जटिल, गुंतागुंतीचा विषय आणि त्याचे विविध आयाम काव्यरूपात मांडणे हे आव्हान होते. पण जोंधळे यांनी ते पेलले आहे. “
ते पुढे म्हणाले, गांधीजी हा विषय शब्दात पकडणे हे मोठे आव्हान आहे. कारण गांधीजी बोलण्यापेक्षा कृतीला महत्त्व देत. आपल्या छोट्या छोट्या कृतीतून ते विचार मांडत आणि पोहचवतही. त्यामुळे गांधींजीच्या मार्गाने जाणे, तो विचार समाजमनात रुजवणे कठीण असते. कारण त्यात खोटेपणाला, दांभिकतेला स्थान नसते. पण समाजमन अजूनही पूर्णपणे नापीक झालेले नाही. गांधीजींची पारदर्शकता, मूल्यांवरील निष्ठा आणि पराकोटीचा त्याग करण्याची वृत्ती नक्की रुजेल असा विश्वास जोंधळे यांची दीर्घकविता मनात बिंबवते हे या कवितेचे मोठे यश आहे”.
गांधींजींच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून उल्हासदादा पवार यांनी त्यातून घडणारे विचारदर्शन उलगडून दाखवले. 
कवी महावीर जोंधळे यांनी लेखनामागील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “कळायला लागलं तेव्हापासून गांधीजी हे माझ्या चिंतन मननाचा विषय आहेत. माझ्या इतर लेखनातून कळत नकळत गांधी विचार आला आहे. पण तो विचार अशा रीतीने काव्यरुप घेऊन येईल असे वाटले नव्हते. पण लॉकडाऊनच्या काळात स्वतः कडे, स्वतः च्या जाणिवांकडे आणि गांधीजींच्या त्यातील स्थानाकडे अंतर्मुख होऊन विचार करायला थोडी उसंत मिळाली. भोवताली जे क्रौर्य, निराशा, हिंसा दिसते आणि लाखो मजुरांच्या स्थलांतरानेही न हललेली राजकीय बेदरकारी गांधींजीच्या मोठेपणाची तीव्रतेने जाणीव होत राहिली आणि त्यातूनच ही दीर्घ कविता जन्माला आली. मला खात्री आहे की आज अंधःकार असला तरी गांधी विचार आपल्याला या अंधारातून बाहेर काढेल. नवी पिढी ज्या पद्धतीने गांधी विचार आत्मसात करतेय आणि इतक्या भयंकर काळातही धर्मांध शक्तींना पुरून उरतेय ते पाहून गांधी विचारांवरची श्रद्धा अधिक दृढ होते. “
कादंबरीकार श्रीरंजन आवटे यांनीही समकालीन हिंसक राजकीय वातावरणात गांधीजींचा अहिंसेचा आणि सत्याचा मार्गच आपल्याला तारून नेऊ शकतो असा विश्वास व्यक्त केला. 
प्रास्ताविक आर्ष पब्लिकेशन्सचे व्यवस्थापकीय संपादक दिलीप चव्हाण यांनी केले. यावेळी प्रकाशिका नूतन मनोहर वाघ, प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता हनमघर, ज्येष्ठ लेखिका इंदुमती जोंधळे, पत्रकार शर्मिष्ठा भोसले, दिग्दर्शक धनंजय भावलेकर, मानसी द्रविड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading