fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRAPUNE

आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. २७ – गेल्या ५० – ६० वर्षांमध्ये आयुर्वेदाची मोठ्या प्रमाणात उपेक्षा झाली. मात्र आता आयुर्वेदाच्या पुनरुज्जीवनाचा काळ आला आहे. आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र दोघांचीही स्वतंत्र बलस्थाने आहेत. या शाखांनी एकत्रितपणे संशोधन कार्य केल्यास कर्करुग्णांना तसेच इतर रुग्णांना त्याचा मोठा लाभ होईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. सध्या जगाला भेडसावत असलेल्या कोरोना संसर्गावरदेखील आयुर्वेदाच्या माध्यमातून संशोधन होऊन उपचार शोधला जाईल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

पुणे येथील भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टच्या एकात्मिक कर्करोग उपचार व संशोधन केंद्राने टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक सहकार्याने तयार केलेल्या आयुर्वेदिक ‘किमो रिकव्हरी किट’चे आज राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथून लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

वैद्यकीय संशोधन कार्य हे सखोल व सातत्यपूर्ण झाले पाहिजे असे सांगून आयुर्वेदातील संशोधन जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्याचे पेटंट दाखल झाले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले. आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी केवळ मार्केटिंग न करता संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टतर्फे कर्करोग उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांचे ७ पेटंट दाखल केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना संस्थेच्या संशोधन कार्याशी टाटा ट्रस्ट जोडले असल्यामुळे संस्थेच्या कार्याला विश्वसनीयता लाभली आहे असे राज्यपालांनी सांगितले.

किमोथेरपी झालेल्या कर्करुग्णांना रुग्णांना अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. किमो रिकव्हरी किटमधील आयुर्वेदिक औषधांमुळे रुग्णांना दिलासा मिळेल असा विश्वास राज्यपालांनी यावेळी व्यक्त केला.

भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टचे अध्यक्ष वैद्य सदानंद सरदेशमुख, वैद्य देवेंद्र त्रिगुणा, विवेकानंद रुग्णालय लातूरचे संस्थापक डॉ.  अशोक कुकडे, कर्करोग विभागाचे डॉ. अरविंद कुलकर्णी, डॉ.विनीता देशमुख, डॉ. शुभा चिपळूणकर, यांची यावेळी समयोचित भाषणे झाली. उद्योगपती रतन टाटा यांनी व्हिडिओ संदेशातून संस्थेला शुभेच्छा दिल्या. डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading