fbpx
Friday, April 19, 2024
PUNE

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम यशस्वीपणे राबवून कोरोनाचा संसर्ग रोखूया – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे,दि.15: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वपूर्ण आहे. लोकसहभागातून ही मोहीम यशस्वीपणे राबवून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखूया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा आज जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला आमदार अशोक पवार व पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, कुंजीरवाडीच्या माजी सरपंच सुनीता धुमाळ आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार अशोक पवार व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात येणाऱ्या कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणी केंद्राला भेट देवून माहिती घेतली आणि तपासणी मोहिमेत सहभागी अधिकारी, कर्मचारी व आशा वर्कर यांना मार्गदर्शन केले. तसेच गृहभेट देवून कोरोना लक्षणांबद्दल नागरिकांची विचारपूस करुन त्यांची प्राथमिक आरोग्य चाचणी घेतली.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी चाचण्यांची क्षमता वाढवण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत, तरीदेखील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांच्या सहकार्यातून पुणे जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवूया, असे डॉ.देशमुख यांनी सांगितले. शासनाचे सर्व विभाग याकामी सक्रिय असून या मोहिमेत नागरिकांनीही स्वतः हून सहभागी होऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार अशोक पवार म्हणाले, कोणतेही अभियान व योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असतो. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोना बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल. नागरिक व रुग्णांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासकीय यंत्रणा अहोरात्र झटत आहे. नागरिकांनीही मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, सोशल डिस्टन्सिंग आदी खबरदारी घेवून कोरोनाला आळा घालावा.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मोहिमेची सविस्तर माहिती दिली. घरोघरी सर्वेक्षण करुन कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगितले.

गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांनी हवेली तालुक्यातील कोरोना परिस्थितीची व अभियानाची माहिती दिली. आभार दादा कुंजीर- पाटील यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading