fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

जम्बो कोविड सेंटरच्या अनागोंदी कारभाराचा खुलासा करा- शिवसंग्रामची मागणी

पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत पुण्यात जम्बो कोविड सेंटर उभारले, त्यासाठी १०० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च केला असल्याचे सांगितले. मात्र, येथील अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य कोरोनाच्या रुग्णांसह पत्रकारांना देखील स्वत:चे प्राण गमविण्यापर्यंत बसला आहे. त्यामुळे शासनाने या अनागोंदी कारभाराचा खुलासा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसंग्राम पुणे शहरतर्फे देण्यात आला आहे.

शिवसंग्राम पुणे शहर तर्फे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व पुणे मनपा आयुक्तांना याबाबतच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, पश्चिम महाराष्ट्र सामाजिक न्यायविभाग अध्यक्ष किरण ओहोळ, समीर निकम, कालिंदी गोडांबे, सचिन दरेकर आदी उपस्थित होते.

भरत लगड म्हणाले, जम्बो कोविड सेंटरमुळे पुणे व परिसरातील कोरोनारुग्णांची फार मोठी सोय होईल, अशी अपेक्षा होती. पण आजपर्यंतचा अनुभव पाहता पुणेकरांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. कोटयावधी रुपये खर्च करुन उभारलेले हे सेंटर प्रत्यक्ष शासकीय यंत्रणेद्वारे न चालवता एका बेजबाबदार खासगी संस्थेला चालवायला दिले, ही चूक देखील उघड झाली आहे. ही रक्कम पूर्वीपासून सुरु असलेल्या सेंटरला दिली असती, तर तेथील रुग्णसंख्या व वैद्यकीय सेवा वाढविता आली असती. त्यामुळे या अनागोंदी कारभाराचा शासनाने खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading