fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

आजही आपण कोरोनाच्या चक्रव्युहात – डॉ. अविनाश भोंडवे

पुणे, दि. 18 – कोरोनाने सगळ्या जगाला वेठीस धरले असून यातून बाहेर पडण्यासाठीचा खात्रीशीर मार्ग अजून सापडलेला नाही. कदाचित 2020 या वर्षाच्या शेवटी आपली यामधून सुटका होईल, अशी आशा वाटते आहे. मात्र, आजही आपण कोरोनाच्या चक्रव्युहात आहोत, असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.

येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे प्रकाशित डॉ. अविनाश भोंडवे लिखित ‘कोरोनाचा चक्रव्यूह’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन आज दिलीपराज प्रकाशन आणि आडकर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, त्यावेळी डॉ. भोंडवे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार पराग कंरदीकर, दिलीपराज प्रकाशनाचे प्रमुख राजीव बर्वे, आडकर फौंडेशनचे प्रमुख अॅड. प्रमोद आडकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांसाठीच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी बोलताना डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला देखील त्याचे निदान होऊ शकले नाहीत. विषाणूजन्य निमोनिया असे त्याला म्हटले गेले आणि पाहता पाहता त्याने सगळ्या जगाला आपल्या विळख्यात घेतले. हा संसर्गजन्य आजार संपूर्ण जगासाठी महामारी ठरेल, असा विचार देखील कोणी केला नव्हता. आम्ही वैद्यकीय अभ्यास करताना सार्ससारख्या आजारांनी देखील ठाण मांडले होते, मात्र त्याचे स्वरूप कोरोनाइतके व्यापक नव्हते. आज या संदर्भात सगळ्या पातळ्यांवर योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. भारतीयांमध्ये आरोग्य साक्षरतेचे प्रमाण कमी असून त्यात समाजमाध्यमांवरील अफवांमुळे सगळ्यांवरील ताण वाढतो आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांना विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी आणि त्याआधारे सकारात्मक वातावरण तयार होण्यास हातभार लावण्यासाठी मी हे लेखन केले आहे. याव्दारे निदान अफवा आणि अंधश्रद्धांची साखळी तोडता येईल, असे वाटते.

पत्रकार पराग कंरदीकर म्हणाले की, कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. एरवी बातम्या मिळविण्याच्या निमित्ताने सतत बाहेर असलेल्या माध्यम प्रतिनिधींना देखील कोरोनामुळे घरात बसून काम करावे लागत आहे. प्रत्येक शतकाच्या सुरुवातीला अशा महामारीने मानवी जीवन ढवळून काढले आहे, असे दिसून येते. अशा परिस्थितीत नियमांचे योग्य पालन आणि सकारात्मकता यांच्या जोरावर आपण या परिस्थितीवर मात करू, अशा आशावाद बाळगणे आवश्यक आहे.

व्यक्त केले. दिलीपराज प्रकाशनाचे प्रमुख राजीव बर्वे यांनी पुस्तक प्रकाशन करण्यामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. प्रमोद आडकर यांनी केले. मधुर बर्वे यांनी सूत्रसंचालन केले, तर मोहित बर्वे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading