fbpx
Friday, April 19, 2024
MAHARASHTRA

‘या’ मंत्र्यासह त्यांचे 5 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 12 – राज्यातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. काल रात्री धनंजय मुंडे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचेही समजते. यामध्ये त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश आहे. मात्र मुंडे यांच्यासह या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आढळत नसल्याचे सांगितले जात आहे.

यापूर्वीही महाविकासआघाडी सरकारमधील अशोक चव्हाण आणि जितेंद्र आव्हाड या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली होती. ते दोघेही बरे झाले आहेत. तसेच मंत्रालयातील काही सचिवांसह काही अधिकाऱ्यांनादेखील कोरोना झाला होता. यातील अनेकजणांनी कोरोनावर मात केली आहे. आता मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मुंडे बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाले होते. तर ८ जून रोजी त्यांनी बीड जिल्ह्यातील पहिल्या कोरोना विषाणू थ्रोट स्वॅब तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण देखील केले होते.

दरम्यान, राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील २४ तासांत राज्यात कोरोनाचे ३ हजार ६०७ नवे रुग्ण आढळले असून १५२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ९७ हजार ६४८ झाला असून मृतांचा आकडा ३ हजार ५९० वर पोहोचला आहे. तसेच मागील २४ तासांत १ हजार ५६१ रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत एकूण ४६ हजार ७८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading