fbpx
Thursday, April 25, 2024
MAHARASHTRA

४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहून अधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात

९४ कोटी रूपयांहून अधिक खर्च; मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार

मुंबई दि. ३०: परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. काल २९ तारखेपर्यंत ४१ हजार ८७४ बस फेऱ्यांच्या माध्यमातून ५ लाख ८ हजार ८०३ स्थलांतरितांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा नजीकच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात आले आहे. परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत बसने पाठविण्यासाठी शासनाने १०० टक्के निधी उपलब्ध करून दिला असून आतापर्यंत ९४.६६ कोटी रुपये यावर खर्च झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले आभार

हे काम एसटी महामंडळ आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनी हातात हात घालून केले आहे. एसटी महामंडळाने बसेस उपलब्ध करून दिल्या तर रस्त्याने पायी जाणाऱ्या लोकांना थांबवून तसेच ट्रक किंवा अन्य माध्यमातून जाणाऱ्या लोकांना थांबवून त्यांच्या प्रवासासाठी बसची व्यवस्था उपलब्ध करणे, त्यांना नियोजनबद्धरित्या बसमध्ये बसवून देण्याचे काम संबंधित जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. अवैधरित्या लोकांना घेऊन जाणाऱ्या ट्रक आणि इतर वाहनांवर आरटीओ कार्यालयामार्फत कारवाई करण्यात आली आहे.

अशा आपत्तीच्या प्रसंगी मदतीचे अनेक हात पुढे येत असताना सर्वसामान्य लोकांसाठी सेवा देणाऱ्या एसटी महामंडळ तसेच आरटीओ कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले असून त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अडचणीच्या काळात यंत्रणेतील या सर्व कर्मचाऱ्यांची मदत खूप मोलाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

स्थलांतरितांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अर्थात आपल्या राज्याची रक्त वाहिनी म्हणून जिचा आदराने उल्लेख होतो त्या एसटी महामंडळाच्या बसेस पुढे आल्या आणि आता या बसेसमधून इतर राज्यातील लोकांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत किंवा जवळच्या रेल्वे स्टेशनपर्यंत नेऊन सोडण्यात येत आहे.

आतापर्यंत आपल्या लाल परीने मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत जाऊन स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

यातील काही स्थलांतरित मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचाही लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरित मजूर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचेही काम केले जात आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading